मसालेदार

2

मीना आंबेरकर

नवरात्राचे नऊ दिवस नऊ रंगात रंगलेले हे दिवस तसेच उपासतापासाचे संपले. एकंदरीत क्रतवैकल्य श्रावणापासून सुरू झालेला हा कालावधी संपला. आता काही तरी चटपटीत चटकदार खाण्याचे दिवस सुरू झाले. ऋतुमानातही बदल होत आहे. दिवस लहान, रात्री मोठय़ा होऊ लागल्या. रोजच्या दैनंदिन कार्यातून घरी आल्यावर काही तरी चटकमटक चटपटीत खावेसे वाटू लागले. क्रतवैकल्ये संपल्यामुळे खाण्यापिण्यावरचे निर्बंध सैलावले. घरातल्या घरात टी. व्ही पुढे बसून काही तरी मस्त खावे थोडेसे का होईना जिभेचे चेचले पुरावावे असे वाटू लागते. त्यासाठी बघू या घरच्या घरी करता येण्यासारखे काही चटपटीत खाद्यकृती.

dabeli

दाबेली

साहित्य…1 वाटी बटाटा उकडून कुस्करून घेणे, 1 चमचा लाल मिरची पूड, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा दालचिनी पूड, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 चमचा तेल फोडणीसाठी, मीठ चवीनुसार, 10 गोल पाव (बेकरीचे) 1 कांदा बारीक चिरून, अर्धा कप भाजलेले शेंगदाणे. अर्धा कप कोथिंबीर चिरलेली, 1 कप बारीक शेव, अर्धा कप डाळींबाचे दाणे, अर्धा कप लसणाची ताजी चटणी, अर्धा कप खजुराची चटणी, अमूल बटर.

कृती…कढईत तेल घालून जिरे व हिंग फोडणीस घालावे. गॅस मंद करावा. नंतर धणे पावडर, जिरे पावडर, दालचिनी पूड, उकडलेला बटाटा, मीठ घालावे. वरून थोडा पाण्याचा हबका मारून मिश्रण परतून घ्यावे. गॅसवरून उतरून थंड करून घ्यावे. पाव मधोमध आडवे कापून घ्यावेत. त्याला अमूल बटर लावावे. गॅसवर तवा ठेवून पाव थोडे गरम करून घ्यावेत. गरम केलेला पाव घेऊन त्यामध्ये तयार केलेले बटाटय़ाचे मिश्रण पसरावे. त्यावर चिरलेला कांदा, शेंगदाणे, कोथिंबीर, डाळींबाचे दाणे घालावे. अर्धा चमचा लसणाची चटणी व 1 चमचा खजूर चटणी घालावी. त्यावर शेव घालून पाव दाबून बंद करावा. सॅण्डविच केलेला पाव तूप घातलेल्या तव्यावर ठेवून गरमच सर्व्ह करावा.

chicken-pakoda

चिकन पकोडा

साहित्य…10-12 चिकन तुकडे. (मध्यम आकाराचे), 2 चमचा आले-लसूण पेस्ट, 2 चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, मीठ चवीनुसार, बॅटरसाठी- 1 अंडे, 1 चमचा तेल, अर्धी वाटी मैदा, पाव चमचा काळीमिरी पावडर, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी.

कृती…प्रथम चिकनला आलं-लसूण पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, काळी मिरी पावडर लावून कुकरमध्ये थोडे वाफवून घ्यावे. जास्त वाफवू नये. नाही तर हाडापासून चिकन वेगळे होईल. एका बाऊलमध्ये अंडे, तेल, मैदा, मीठ, काळीमीरी पावडर घेऊन त्यात थोडे पाणी घालून मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यावे. कढईत तेल गरम करून घ्यावे. चिकनचे तुकडे मैद्याच्या पिठात बुडवून डीप फ्राय करावेत. कुरकुरीत झाल्यावर हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

मटण चॉप्स

साहित्य…8-10 मटण चॉप्स, 1 छोटा कांदा, 7-8 लसूण पाकळय़ा, अर्धा इंच आले, 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पूड, 1 चमचा धणे-जिरे पावडर, अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी ब्रेड क्रम्स, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी.

कृती…चॉप्सना थोडे मीठ लावून दोन शिटय़ा काढून कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. कांदा, लसूण, आलं, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, धणे, जिरे पूड, लिंबाचा रस एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी. तयार केलेली पेस्ट चॉप्सना लावून एक तासभर तसेच ठेवावेत. कढईत तेल कडकडीत गरम करून तयार केलेले चॉप्स ब्रेडक्रम्समध्ये घोळवून तळून घ्यावेत. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

macroni

मॅक्रोनी हॉटपॉट

साहित्य…1 छोटा डबा बेक बिन्स, 2 कप शिजवलेली मॅक्रोनी, 2 कांदे गोल चकत्या करून, 2 भोपळी मिरच्या गोल चकत्या कापून (बिया काढून), 2 टोमॅटो गोल कापून, 5-6 लसूण पाकळय़ा चिरून, 100 ग्रॅम चीज किसून, अर्धा टोमॅटो सॉस, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचा अमूल बटर, अर्धा चमचा साखर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मीठ चवीनुसार.

कृती…एका भांडय़ात अमूल बटर घालून ते थोडे विरघळल्यावर लगेच त्यावर कांदा घालून थोडासा परतावा. भोपळी मिरची, टोमॅटो घालून परतून घ्यावे. जास्त लाल करू नये. लसूण व मिरची पावडर, हिरवी मिरची घालून तीन ते चार मिनिटे परतावे. नंतर शिजवलेल्या मॅक्रोनी, बेक बीन्स टोमॅटो सॉस, थोडे मीठ, साखर घालून एकत्र करावे व मिश्रण गॅसवरून खाली उतरवावे. बेकिंग डिशला आतून थोडे बटर लावून घ्यावे. त्यावर तयार केलेले मिश्रण घालून व्यवस्थित पसरून घ्यावे. त्यावर किसलेले अर्धे चीज पसरवावे. त्यावर पुन्हा कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची यांच्या चकत्या घालून उरलेले चीज पसरवावे असे थर झाल्यावर 1 चमचा वितळवलेले बटर घालावे. तयार झालेले मिश्रण 180 अंश सेंटिग्रेडला ओव्हनमध्ये 20 ते 25 मिनिटे बेक करावे. चीज वरून लालसर झाले की डीश तयार झाली समजावे व गरमच सर्व्ह करावे.