गरमागरम जिलेबी

साहित्य  २ वाटय़ा मैदा, १ चमचा बेसन पीठ, १ चमचा तेल, २ चमचे आंबट दही, २ वाटय़ा साखर, केशर, १ लिंबू पाकात पिळण्यासाठी, तळण्यासाठी तेल किंवा तूप.

कृती सर्वप्रथम जिलेबी करायच्या आदल्या दिवशी कोमट पाण्यात मैदा, बेसन, तेल, दही घालून गुठळी न होता भज्याप्रमाणे भिजवावे. खाण्याचा रंग घालायचा असल्यास तो पीठ भिजवतानाच घालावा. जिलेबी करायच्या दिवशी पीठ घट्ट झाल्यास कोमट पाणी वापरून बेताचे सैलसर करावे. साखरेचा एकतारी पाक करावा. त्यात केशर, लिंबूरस घालावा. शक्यतो पितळेची कल्हई केलेली परातीत भरपूर तूप किंवा तेल आवडीनुसार घालून ती गॅसवर ठेवावी. प्रथम तेल व्यवस्थित तापू द्यावे. तापल्यावर गॅस बंद करून जिलेबी तळाव्यात. जिलेबीचा रंग गुलाबी होईपर्यंत तळावे आणि त्या पाकात टाकाव्यात. पाक नेहमी गरम असावा. पुढचा घाणा झाल्यावर पहिल्या काढाव्यात.

टीप  जिलेबी कडक हवी असल्यास जास्त तळावी. मऊ हवी असल्यास बेताची तळावी. दह्याचे किंवा बेसनाचे प्रमाण जास्त झाल्यास जिलेबीवर गाठी आल्यासारखी जिलेबी दिसते. एकदा वापरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा वापरू नये. जिलेबी करण्यासाठी सॉसच्या बॉटलचा वापर करावा किंवा नारळाच्या करवंटीचासुद्धा वापर करता येऊ शकतो.