कढाई पनीर

साहित्य – पनीर ३०० ग्रॅम, १ भोपळी मिरची, ३ टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, १०-१२ काजू, चिमूटभर हिंग, २ ते ३ मोठे चमचे तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे, १ छोटा चमचे जिरे, हळद १ छोटा चमचा, १ चमचा धणे पावडर, १ मोठा चमचा कसूरी मेथी, १ छोटा चमचा आल्याची पेस्ट, थोडासा गरममसाला, १ छोटा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ

कृती – सर्वप्रथम पनीरचे १ इंच आकाराचे चौकोनी तुकडे कापून घ्या. सिमला मिरची स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून चिरा. एका कढईत दोन ते तीन मोठे चमचे तेल घालून गरम करा. गरम तेलात पनीरचे तुकडे हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्या. दोन्हीकडून परतवून झाल्यावर पनीरचे तुकडे एका ताटलीत काढा. नंतर चिरलेली भोपळी तेलात खरपूस होईपर्यंत परतवा. झाकण ठेवून १ मिनिटे वाफ येऊ द्या. परतलेली भोपळी मिरचीही एका ताटात काढून ठेवा. त्यानंतर टोमॅटो, हिरवी मिरची आणि काजूची बारीक पेस्ट तयार करून ठेवा. कढईत २ मोठे चमचे तेल तापवून जिऱ्याची फोडणी द्यावी. नंतर हिंग, हळद, धणे पावडर, कसुरी मेथी घालून हलकेसे परतून घ्या. नंतर त्यामध्ये आल्याची पेस्ट, टोमॅटो, काजू आणि हिरव्या मिरचीची तयार करून ठेवलेली पेस्ट आणि लाल तिखट घालून तेलात एकजीव होईपर्यंत परतवून घ्या. त्यानंतर यामध्ये गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्धा कप पाणी घाला. यामध्येच भोपळी मिरची, पनीरचे तुकडे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ढवळा. कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी चार ते पाच मिनिटे शिजवा . पनीर आणि भोपळी मिरचीमध्ये सर्व मसाले व्यवस्थित शिजले की, कढई पनीर सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.