खासगी प्रवासी बसवरील बंदीचा फेरविचार करा – महाराष्ट्र वाहतूक सेना

सामना प्रतिनिधी, मुंबई

खासगी प्रवासी बस आणि जड वाहनांना मुंबईत सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते १० वाजेपर्यंत घालण्यात आलेली बंदी ही महाराष्ट्रभरातील प्रवाशांसाठी गैरसोयीची आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे ही प्रवेशबंदी मागे घ्यावी. नाही तर आंदोलन उभारू, असा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेने दिला आहे.

अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक) यांच्या खासगी बस आणि जड वाहनांना ठरावीक वेळेत बंदीच्या अधिसूचना/आदेशानुसामुळे वाहतूकदारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. आरटीओ कर, वाहनांच्या किमती, वाहनांची देखभाल, बँकेच्या कर्जाचे हप्ते यामुळे व्यवसाय करणे कठीण होत असतानाच या निर्णयामुळे वाहतूकदारांबरोबरच हजारो प्रवाशांना मानसिक आणि आर्थिकदृष्टय़ा त्रास सहन करावा लागणार आहे.

महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष उदय दळवी यांच्या प्रयत्नाने मुंबईमधील वाहतूकदारांना एकत्र करून या निर्णयाविरोधात आंदोलन उभारले जाणार आहे. शिवसेना वाहतूकदारांच्या पाठीशी असून शिवसेना भवन येथे लवकरच एका बैठकीचे आयोजन केले जाईल. वाहतूकदारांच्या होत असलेल्या एकजुटीमुळे वाहतूक पोलीस प्रशासन वाहतूकदारांच्या संघटनेला एकत्र न बोलवता काही संघटनांना वेगवेगळे बोलावून त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही दळवी यांनी केला.

अप्पर पोलीस आयुक्तांच्या अधिसूचनेमुळे सामान्यांसह वाहतूकदारांनाही त्रास सहन करावा लागत आहे. सर्वसामान्यांना होणाऱया या गैरसोयीबद्दल आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र वाहतूक सेना आंदोलन उभारणार आहे. – उदय दळवी, अध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेना