महापालिकेची ‘बेस्ट’कडून मलनिःसारणासाठी ९० कोटींची  वसुली

सामना ऑनलाईन | मुंबई

महापालिका प्रशासनाने ‘बेस्ट’कडून मलनिःसारणासाठी जल देयक आणि मालमत्ता कर अशा दोन्ही मार्गांनी तब्बल ९० कोंटींची वसुली केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आधीच आर्थिक डबघाईला आलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे वसूल केलेली रक्कम तातडीने परत करावी अशी मागणी ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.

‘बेस्ट’ उपक्रमाची मुंबईत २७ बस आगारे असून विविध बस स्थानके, बेस्ट कामगार वसाहती, कार्यशाळा, विद्युत केंद्रे अशा विविध मालकीच्या जागा आहेत. या सर्व मालमत्तांचे पाणी व मालमत्ता कर मुंबई महापालिकेकडे वेळोवेळी भरावा लागतो. ‘बेस्ट ’उपक्रम हा पालिकेचा उपक्रम असला तरी पालिकेचे सर्व कर ‘बेस्ट’ उपक्रमाला भरावेच लागतात. पालिका जल देयकाबरोबरच मलनि:सारण कर समाविष्ट करून देयके पाठवत असते. मात्र पालिकेने पाण्याच्या देयकाबरोबर मलनि:सारण कर घेतला असताना मालमत्ता कराबरोबरही मलनि:सारण कर वसूल केला. या दुप्पट वसुलीचा फटका ‘बेस्ट’ला बसला असून ही पालिकेने तातडीने परत करावी अशी मागणी ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केली आहे.

मदत करण्यास नकार, मात्र वसुली भरमसाट

आर्थिक डबघाईला आलेल्या ‘बेस्ट’ला वाचवण्यासाठी पालिकेने मदत करावी यासाठी पाठपुरावा सुरू असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. असे असताना मलनिःसारणासाठी मात्र दुप्पट वसुली करण्यात येत आहे. ही रक्कम ६० टक्क्यांपर्यंत पालिकेने ‘बेस्ट’कडून आतापर्यंत तब्बल ९० कोटी रुपये वसूल केले असल्याचे ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले. ही बाब पालिका प्रशासनाने मान्य केल्याचेही ते म्हणाले.