मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक भरती घोटाळा, डॉ. धनराज माने निलंबित

सामना ऑनलाईन, मुंबई

संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अध्यापक आणि कर्मचारी नियुक्ती घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना आज निलंबित करण्यात आले आहे. या नोकरभरती घोटाळ्यावरून सभागृहात गोंधळ झाल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निलंबनाची घोषणा केली. डॉ. माने यांना पाठीशी घालणाऱ्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेवानिवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी माहितीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांना प्रशांत बंब आणि इतर सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिला. २०१२ मध्ये संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अध्यापक, प्रपाठक तसेच वर्ग ३ व ४ मधील ५६ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार होती. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालाबाबत कारवाई का झाली नाही, असा मुद्दा साबणे यांनी उपस्थित केला. शिक्षणमंत्र्यांनी माने यांना तडकाफडकी निलंबित करून चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. माने यांना पाठीशी घालणाऱया सचिव स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींची नेमणूक केली जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.