लाल दिवा विझला!

माणूस हा गाडीवरील लाल दिव्याने मोठा ठरत नाही तर कर्तृत्वाने मोठा ठरतो, या मताचे आम्ही आहोत. अनेक बडय़ा पदांवर बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर लाल दिवा आहे. पण देशाला लोकांना त्यांचा उपयोग शून्यच आहे. शिवसेनाप्रमुखांसारख्या नेत्यांच्या गाडीवर कधीच लाल दिवा नव्हता, पण त्यांचे कर्तृत्व, लोकप्रियता महान होती. लाल दिवा हीच कर्तबगारी असे समजणाऱयांना पंतप्रधानांच्या निर्णयाने नक्कीच धक्का बसला असेल.

 मेपासून लाल दिवा हद्दपार होणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. देशभरात बोकाळलेल्या ‘व्हीआयपी’ संस्कृतीला चाप लावण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींपासून मंत्र्यांपर्यंत कोणीही लाल दिव्याचा मुकुट मिरवत रस्त्यांवर फिरू शकणार नाही. पंतप्रधानांचा आदेश येताच भाजपशासित राज्यांतील मंत्र्यांमध्ये आपापल्या गाडय़ांवरचे लाल दिवे काढण्याची शर्यतच लागली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही लाल दिव्याचा मळवट पुसून टाकला. त्यामुळे मंत्र्यांनाही लाल दिव्यांना रामराम करावा लागेल. हा निर्णय ऐतिहासिक किंवा क्रांतिकारक वगैरे असल्याचे बँडबाजे वाजायला सुरुवात झाली असली तरी पंतप्रधानांनी लोकांच्या मनातील भावनेचीच एक प्रकारे अंमलबजावणी केल्याचे दिसत आहे. पंतप्रधानांच्या मनात आले व त्यांनी लाल दिवे विझवण्याचा निर्णय घेऊन टाकला. राजकारणी व नोकरशाहीने लाल दिव्यांच्या बाबतीत एकप्रकारे अतिरेकच चालवला होता. उप जिल्हाधिकाऱयापासून राज्याच्या मुख्य सचिवापर्यंत विविध रंगांच्या दिव्यांची नुसती रंगपंचमीच रस्त्यांवर दिसत असे. महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा हवा असतो तो फक्त लाल दिव्यासाठीच. लाल दिव्याविषयीची आदरयुक्त भीती त्यामुळे कमी झाली व लाल दिवा हा राजकीय काळय़ा बाजारात मिळणारे साधन ठरले. नाराजांना खूश करायचे असेल तर लाल दिव्याचे एखादे पद देऊन गप्प करायचे हा तर धंदाच बनून गेला होता. पंतप्रधान मोदी यांनी लाल दिव्याची दुकाने मोडीत काढली आहेत. नोटाबंदीप्रमाणेच हा निर्णय धाडसीच म्हणावा लागेल. प्रश्न फक्त इतकाच आहे की नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाला आणि लोकांना नेमका काय फायदा झाला ते कळायला मार्ग नाही. त्याचप्रमाणे लाल दिवा मोडीत काढल्याने देशातील व्हीआयपी संस्कृती खरोखरच नष्ट होणार आहे काय की सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेला हा निर्णय आहे? हा प्रश्नही आहेच. पुन्हा जेथे भाजपचे राज्य नाही अशा ठिकाणचे मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी लाल दिवा वापरायचाच असा निर्णय घेतला तर तुम्ही काय करणार? माणूस हा गाडीवरील लाल दिव्याने मोठा ठरत नाही तर कर्तृत्वाने मोठा ठरतो, या मताचे आम्ही आहोत. अनेक बडय़ा पदांवर बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर लाल दिवा आहे. पण देशाला व लोकांना त्यांचा उपयोग शून्यच आहे. अशा लोकांसाठी सत्ता आणि लाल दिवा वांझ ठरतो, मिरवायचे साधन ठरते. शिवसेनाप्रमुखांसारख्या नेत्यांच्या गाडीवर कधीच लाल दिवा नव्हता, पण त्यांचे कर्तृत्व, लोकप्रियता महान होती. लाल दिवा हीच कर्तबगारी असे समजणाऱयांना पंतप्रधानांच्या निर्णयाने नक्कीच धक्का बसला असेल. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

नैतिकची ऐशीतैशी

शिक्षकी पेशाला आपल्या देशात उच्च नैतिक मूल्यांची पुरातन परंपरा आहे. मात्र सध्या इतर सर्वच क्षेत्रांना जशी विकृतीची लागण झाली आहे तशी ती शिक्षकी पेशालाही झाली आहे. या पेशाच्या उच्च परंपरेला काळिमा फासणारी कृत्ये शिक्षकांमधीलच काही विकृत लोक करू लागले आहेत. नागपुरातील एका शिक्षकाने तर विकृती आणि निर्लज्जपणाची परिसीमाच गाठली. प्रा. अमित गणवीर या शिक्षकाने परीक्षा हॉल तिकीट परत देण्याच्या बदल्यात संबंधित विद्यार्थिनीकडे थेट शरीरसुखाचीच मागणी केली. या विद्यार्थिनीने गणवीर याचे मोबाईलवरील हे संपूर्ण संभाषणच रेकॉर्ड केले आणि रीतसर तक्रार केली. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार चव्हाटय़ावर आला. मोबाईलवरील संभाषण रेकॉर्ड होऊ शकते आणि त्यामुळे त्यावर बोलणे जोखमीचे ठरू शकते याची कल्पना असूनही हा शिक्षक बेधडकपणे मोबाईलवर अश्लाघ्य मागणी करतो यावरून तो पराकोटीचा निर्लज्ज असल्याचेही दिसून येते. कदाचित यापूर्वी त्याचे असे प्रकार बदनामीच्या भीतीपोटी चव्हाटय़ावर आले नसतील. त्यामुळेही त्याचे धाडस वाढले असेल. मात्र ‘बॅचलर ऑफ ब्युटी कल्चर ऍण्ड हेअर डिझायनिंग’ या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीने त्याची विकृती जगासमोर आणली हे चांगलेच केले. शिक्षकांनी विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या, त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना अलीकडे वारंवार समोर येत असतात. आश्रमशाळा तर या गैरप्रकारासाठी बदनामच आहेत. या वाढत्या अनैतिक प्रकारांमुळेच राज्य सरकारने चार वर्षांपूर्वी शिक्षक आणि प्राध्यापकांनी चांगल्या नैतिक वर्तणुकीचे ‘हमीपत्र’ लिहून देण्याचे बंधन एका आदेशाद्वारे घातले होते. त्यानुसार किती अध्यापकांनी अशी लेखी हमी दिली हे शासनालाच माहीत. मात्र नागपुरातील शिक्षकाने विकृतीचा कडेलोट करून नैतिकतेची आणि शासकीय ‘हमीपत्रा’चीही ऐशीतैशी केली आहे.

  • Devendra Joshi

    तुमच्या मुंबई महापौराचा लाल दिव्याचा मोह अजून सुटत नाही, त्याला आधी शिकव रडतराऊत! महापौराला कैबिनेट दर्जा कशाला हवा ?