गुरुवारपासून क्रिकेटमध्ये रेड कार्ड येणार

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

फुटबॉलप्रमाणेच क्रिकेटमध्येही गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूला सामन्यातून बाहेर काढण्यासाठी रेड कार्डचा वापर केला जाणार आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या २ कसोटी सामन्यांमध्ये या नियमाचा वापर केला जाणार आहे. मैदानावर क्रिकेटपटूंशी किंवा पंचांशी हुज्जत घालणे, त्यांना धक्काबुक्की किंवा मारहाण करणे अशा गोष्टींसाठी रेड कार्ड दाखवत पंच त्या खेळाडूला संपूर्ण सामन्यासाठी बंदी घालू शकतो.

दक्षिण अफ्रिकेची आणि बांग्लादेशची कसोटी मालिका गुरुवारी सुरू होणार आहे. त्याच दिवशी पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्येही कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. क्रिकेट हा जंटलमन्स गेम म्हणून ओळखला जातो, मात्र तीव्र स्पर्धेमुळे अनेक क्रिकेटपटूंनी जंटलमन अवतार बाजूला ठेवत आक्रमक भूमिका धारण करायला सुरूवात केली आहे. यातून अनेकदा मैदानामध्ये वादाचे, शिवीगाळीचे आणि प्रसंगी हाणामारीचे प्रकार घडतात. त्यामुळे फुटबॉलप्रमाणेच क्रिकेटमध्येही रेड कार्ड नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.