चंद्रपूरमध्ये विदेशी पाहुण्यांचं आगमन, पक्षीमित्रांना भुरळ

अभिषेक भटप्पलीवार । चंद्रपूर

चंद्रपूर येथील वीज केंद्राजवळच्या आवंढा तलावाजवळील राख साठवण परिसरात देशी-विदेशी पक्ष्याचं आगमन झालं आहे. ‘रेड क्रेस्टेड पोचर्ड’ म्हणजे लालसरी आणि ‘बार हेडेड’ गीज म्हणजे राजहंस या दोन विदेशी पाहुण्यांनी पक्षीमित्रांना भुरळ घातली आहे.

अतिशय गोंडस असे हे पक्षी पर्यटकांच्या नजरेत आले नसले तरी पक्षीमित्र याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. युरोप, मंगोलिया, हिमालयातून हे पक्षी इथं आले आहेत, अशी माहिती पक्षीमित्र हर्षद महाले यांनी दिली. या पक्ष्यांचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी काढले असून हे निसर्गाचं हे सौदर्यं सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणखी काही दिवस पक्ष्याचं वास्तव्य इथंच असेल अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी जरूर यावे मात्र त्यांना त्रास देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.