शस्त्रक्रियेशिवायही होणार पोट कमी, डॉक्टरांनी शोधली ईएसजी प्रक्रिया

133
belly-fat-12

सामना प्रतिनिधी । मुंबई

बेरिऑट्रिक सर्जरी करून अगडबंब झालेली व्यक्तीचे पोटही आत घालवता येते. शरीराचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) 35 पेक्षा अधिक असल्यास ही शस्त्रक्रिया करता येते. मात्र ज्यांचा बीएमआय 25 ते 35 च्या आत असेल अशांवर बेरिऑट्रिक शस्त्रक्रिया करणे वैद्यकीय नियमांत बसत नाही. अशा व्यक्तींचे वाढलेले पोट शस्त्रक्रियेशिवाय कमी करण्याची ईएसजी (एण्डोस्कोपी स्लीव्ह गॅस्ट्रोप्लास्टी) पद्धत डॉक्टरांनी शोधून काढली आहे. या शरीराचे वाढलेले वजन 15 ते 35 किलोंपर्यंत कमी करणे शक्य होणार आहे.

गॅस्ट्रोएण्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमित मायदेव आणि बेरिऑट्रिक सर्जन डॉ. मोहित भंडारी यांनी बेरिऑट्रिक सर्जरीशिवाय स्थूलपणा कमी करण्यासाठी ईएसजी पद्धती वापरण्यास सुरुवात केली आहे. या पद्धतीद्वारे शरीरावर कोणत्याही पद्धतीची शस्त्रक्रिया न करता तोंडातून थेट एण्डोस्कॉपिक पद्धतीने आतडय़ांपर्यंत पोहोचून आतडय़ांना टाके दिले जातात. याद्वारे आतडय़ांचा आकार कमी केला जातो. यासाठी केवळ एका दिवसाकरिता रुग्णालयात दाखल व्हावे लागते. त्यानंतर संबंधित व्यक्ती आपल्या घरी जाऊ शकते. एक महिना लिक्विड डाएट तसेच अन्य औषधोपचार घेतल्यानंतर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन पाच ते सहा महिन्यांत 15 ते 30 किलोपर्यंत वजन कमी होऊ शकते. या पद्धतीने लहान मुलांपासून ते 50 ते 60 वय असलेल्या व्यक्तींचे वजन नियंत्रणात आणण्यात आल्याचे डॉ. अमित मायदेव यांनी सांगितले. या ईएसजी पद्धतीने उपचार करण्यासाठी डॉ. मायदेव आणि डॉ. भंडारी यांनी ‘एनलायटेन’ (ENLITEN) ही संस्था सुरू केली आहे. याद्वारे देशभरातील स्थूल व्यक्तींवर उपचार करण्यात येणार आहे.

या आजारांपासून सुटका
वाढत्या वजनामुळे डायबेटीस, हायपरटेन्शन, ब्लडप्रेशर, हृदयविकार, सांधेदुखी यासारखे आजार जडतात. मात्र शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी ईएसजी पद्धतीमुळे दूर झाल्यानंतर या सर्व आजारांपासून सुटका मिळून संबंधित व्यक्ती सर्वसामान्य आयुष्य जगू शकते, अशी प्रतिक्रिया डॉ. भंडारी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या