राज्यातील कापूस उत्पादनात पाच लाख क्विंटलने घट

सामना प्रतिनिधी । जालना

कापसावर गुलाबी बोंडअळीने हल्ला केल्याने कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत राज्यामध्ये ५ लाख क्विंटल कापसाची कमी खरेदी झाली आहे. कापसावर पडलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून यामुळे विविध घटकावरही विपरीत परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत राज्यांमध्ये १५ लाख ३० हजार ४२८ लाख क्विंटलची खरेदी व्यापाऱ्यांनी केली होती. या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत १० लाख २५ हजार ९५९ क्विंटल कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे.

राज्यामध्ये खरीप हंगामामध्ये ४२ लाख ६ हजार ६४४ हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यामध्ये नाशिक विभागात ८ लाख २९ हजार ४५५ हेक्टर, पुणे विभागात १ लाख २५ हजार ५०५ हेक्टर, कोल्हापूर विभागात ६० हेक्टर, संभाजीनगर विभागात १० लाख ४८ हजार, ५३८ हेक्टर, लातूर विभागात ५ लाख ४३ हजार ७०५ हेक्टर, अमरावती विभागात ९लाख ९६ हजार १७ हेक्टर तर नागपूर विभागात ६लाख ६३ हजार ३६४ हेक्टरवर लागवड झाली होती.

कापसाचे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात कोरडवाहू व बागायती अशा दोन्ही पद्धतीने कापसाची लागवड होते. सध्या बीटी कापसाचा काळ असून, राज्यात सर्वत्र बीटी कापसाची लागवड झाली असून, बीटीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही असे सांगितले जात असतानाच कापसावर गुलाबी बोंड अळीने तुफान हल्ला केला. शेतकरी व प्रशासनास बोंडअळीच्या धोक्याची कल्पना येईपर्यंतच गुलाबी बोंडअळीने कापसाची बोंडे फस्त केली. यामुळे कापसाचे संपूर्ण पीकच उध्वस्त झाले. कापसाची पहिली वेचणी होऊन जेवढा कापूस शेतकऱ्यांचा घरात आला तेवढेच उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले. उर्वरित सगळा कापूस बोंडअळीने फस्त केल्याने शेतकऱ्यांच्या हातून गेला. गुलाबी बोंड अळीने केलेल्या नुकसानीमुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड तफावत आली असून, डिसेंबर अखेरपर्यंत ५ लाख क्विंटल कापसाची आवक कमी झाली आहे.