रीमा लागू

3
रिमा लागू

>>प्रशांत गौतम<<

चित्रपट, रंगभूमी, मालिका अशा विविध माध्यमांतून आपल्या चतुरस्र अभिनयाचा, बहुरंगी आणि बहुढंगी भूमिकांचा अमीट ठसा उमटविणाऱ्या रीमा लागूंनी अचानक घेतलेली ‘एक्झिट’ त्यांच्यावर पेम करणाऱ्या चाहत्यांना चटका लावणारीच आहे. अनेक हिंदी सिनेमांना लोकप्रियतेच्या उच्चांकावर त्यांनी नेऊन ठेवले. बॉलीवूडमधील सलमान खान, शाहरुख खान, माधुरी दीक्षित, जुही चावला, संजय दत्त या दिग्गज कलावंतांच्या ‘ग्लॅमरस आई’ त्यांनी रूपेरी पडद्यावर साकारली. ‘सिंहासन’मधील करारी सून, ‘तू तू मैं मैं’ मधील खटय़ाळ सासू, मराठी रंगभूमीवरील समर्थ नायिका आणि बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध आई अशा वैविध्यपूर्ण भूमिकांनी रीमा लागूंनी रसिकांच्या मनात घर केले. ‘वास्तव’ चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली रघूभायची कणखर आई ही भूमिका इतर भूमिकांपेक्षाही खूप वेगळी होती. त्यांच्या अकाली जाण्याची चुटपूट मनाला लागून राहणे स्वाभाविक आहे.

मुंबई येथे १९५८ साली जन्म झालेल्या रीमा लागू यांचे शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. शालेय जीवनातच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. आई अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांच्या त्या कन्या. ‘हिरवा चुडा’ ‘हा मार्ग माझा एकला’ अशा चित्रपटांतून बेबी नयन या नावाने बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयाची कारकीर्द सुरू केली. पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे लग्नानंतर रीमा लागू या नावाने ओळखल्या गेल्या व सर्वत्र सुपरिचित झाल्या. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी मराठी नाटकांतून अभिनय क्षेत्राकडे पाऊल टाकले आणि त्यानंतर मात्र मागे वळून बघितलेच नाही. मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेसृष्टीत तब्बल चार दशके अधिराज्य गाजवणाऱ्या रीमांचा १९८० साली ‘कलयुग’ हा पहिला चित्रपट. ‘रिहाई’सारखी धीट वेगळ्य़ा वाटेवरची भूमिका असो किंवा ‘आक्रोश’, ‘कयामत से कयामत तक’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘वास्तव’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कल हो ना हो’ या सुपरहिट चित्रपटांत त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने मोठा पडदा व्यापून टाकला. ५० पेक्षा अधिक चित्रपटांत त्यांनी ताकदीच्या भूमिका केल्या. ‘आक्रोश’मध्ये त्यांनी नृत्य सादर केले. सुप्रिया पिळगावकरसोबत ‘तू तू मैं मैं’, ‘श्रीमान श्रीमती’ या मालिका गाजवल्या. ‘मैने प्यार किया’ हा त्यांच्या करीअरमधील टर्निंग पॉइंट ठरणारा सुपरहिट, सुपरडुपर चित्रपट! १९८०-९० च्या दशकात मराठी सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्री असताना त्यांना राजश्री प्रॉडक्शनच्या ‘मैने प्यार किया’ या सिनेमाची ऑफर मिळाली. निर्माते सूरज बडजात्या यांनी रीमांना चित्रपटासाठी पैसे किती घेणार अशी सहज विचारणा केली. तेव्हा रीमांना वेगळेच टेन्शन आले. दोन दिवस विचार करून त्यांनी २१ हजार रुपये दिले तरी चालतील असे सांगितले. हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टीने ही रक्कम खूपच कमी होती. हिंदी इंडस्ट्रीत कलावंतांना किती पैसे दिले जातात याची रीमांना माहिती नव्हती, मात्र निर्मात्याने त्यांनी सांगितलेल्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने अधिक रक्कम स्वतःहून रीमांना दिली. विविध चित्रपटांत दमदार भूमिका साकारणाऱ्या रीमा लागूंच्या व्यक्तिमत्त्वाची ही वेगळीच छटा अधोरेखित करावीशी वाटते. १९९० साली ‘मैने प्यार किया’, १९९१ साली ‘आशिकी’, १९९५ साली ‘हम आपके है कौन’, २००० साली ‘वास्तव’ या सिनेमांसाठी रीमा लागू यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हिंदी सिनेमांप्रमाणेच मराठी, हिंदी मालिका ‘खानदान’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘तू तू मैं मैं’, ‘दो और दो पांच’, ‘धडकन’, ‘कडवी खट्टीमिठ्ठी’, ‘दो हंसो का जोडा’ यातील भूमिकांमुळे त्या घराघरांत पोहोचल्या तसेच मराठी रंगभूमीवर ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष’, ‘बुलंद’, ‘विठो रखुमाई’, ‘छापा-काटा’, ‘सासू माझी ढासू’ या नाटकांतून त्यांच्या कितीतरी भूमिका लक्षवेधी ठरल्या. पडदा मग चित्रपट, मालिका, रंगभूमी कोणताही असो, तिथे तर त्यांनी अभिनयाची छाप सोडलीच, पण त्यासोबतच त्या उत्तम दिग्दर्शकही होत्या. ‘श्रावणसरी’ या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. रीमा यांच्या अकस्मात निधनाने बॉलीवूडमधील प्रेमळ आई खऱया अर्थाने हरपली आहे. यापुढे त्यांचा प्रेमळ, निरागस चेहरा आता प्रेक्षक, रसिकांना दिसणार नाही. या गुणी अभिनेत्रीचे अचानक निघून जाणे सिने- नाटय़सृष्टीसाठी धक्कादायकच आहे!