प्रतिबिंब

<< निसर्गभान >>   << जे. डी. पराडकर >>

पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे!’ या गीताच्या ओळीतून प्रतिबिंबाचे महत्त्व विषद केलं आहे. मानवापासून सृष्टीतील प्रत्येक सजीवाला आपले प्रतिबिंब पाहायची मोठी आसक्ती असते. यासाठी आरसा हे माध्यम सर्रास उपयोगात आणले जाते. मानवाव्यतिरिक्त अन्य सजीव आपले प्रतिबिंब न्याहाळण्यासाठी स्वच्छ पाण्याचा उपयोग करतात. आपलं प्रतिबिंब कशामध्ये दिसू शकेल, याची समज त्यांच्याकडे असते हे निश्चितच कौतुकास्पद म्हटले पाहिजे. प्रतिबिंब! मग ते निसर्गाचे असो अथवा प्रकाशाचे, मानवी मनाला अंतर्यामी समाधान देण्याचं कर्तव्य ते पार पाडत असते. सजीव अथवा निर्जीव कोणत्याही घटकाचे प्रतिबिंब उमटविण्याचा शोध हा मानवाच्या कल्पक बुद्धीचा परिपाक आहे. प्रतिमा आणि प्रतिबिंब यांचा परस्परांशी निकटचा संबध आहे.

जीवनात प्रत्येक व्यक्तीला मिळणाऱ्या मार्गदर्शकाचे प्रतिबिंब आपोआप त्यांच्या मन:पटलावर उमटत असते. हे प्रतिबिंब विचारांचे, संस्कारांचे, जीवनशैलीचे, श्रमांच्या महतीचे, बुद्धीचे अशा अनेक प्रकारचे असते. जीवनात प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक मार्गदर्शक माता हीच असते. यानंतर शिक्षक, सवंगडी, आप्तेष्ट अशा अनेक व्यक्तींकडून कळत नकळत होणारे संस्कार प्रतिबिंबित होत असतात. असं असलं तरी ठरावीक वयात जीवनाला कलाटणी देणारी व्यक्ती प्रत्येकजण गुरुस्थानी मानत असतो. या गुरुस्थानी असलेल्या व्यक्तिचे विचार आपल्यावर प्रतिबिंबित होणं याचाच अर्थ दोघांच्या विचारांची नाळ घट्ट जुळणं असा होतो. असे गुरू प्रत्येकाच्या जीवनप्रवासात येत असतात, मात्र योग्य वेळी त्यांची भेट होणं आणि त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब आपल्यावर उमटवून घेणं महत्त्वाचे ठरते. शालेय जीवनात असणारी थोडी बेफिकिरी अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडते. यावेळी गुरुजनांच्या संस्कारांचे प्रतिबिंब उमटवून घेण्यात जे यशस्वी होतात त्यांचा जीवनप्रवास सुखाचा होतो. याउलट या संस्कारांचे महत्त्व ज्यांना उशिरा कळते त्यांना सुखाची काही काळ प्रतीक्षाच करावी लागते. ज्यांना प्रतिबिंबाचे महत्त्व योग्य वेळी उमजते त्यांना अडचणींचा फारसा सामना करावा लागत नाही.

पाण्यात पडणारे प्रतिबिंब लक्षवेधक ठरते. यासाठी प्रथम पाणी स्वच्छ असणं गरजेचं असतं. गढूळ पाण्यात प्रतिमा कितीही सुंदर असली तरी त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळत नाही. पाणी स्वच्छ होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. मानवी मनाचंही असंच आहे. मन जर स्वच्छ असेल तर मनात येणारे विचारही निर्मळ आणि पवित्र असतात. अंतर्मनातील विचारबाह्य मनावर प्रतिबिंबित होत असल्यानं अंतर्मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवता येणं महत्त्वाचं आहे. पाण्यात दिसणाऱ्या प्रतिबिंबात कोणतीही अन्य वस्तू उंचावरून पडली तर उमटणाऱ्या लहरींमुळे प्रतिबिंबाचे अस्तित्व संपुष्टात येतं. पाणी शांत होईपर्यंत पूर्वीचा नजारा दिसत नाही. आपल्या मनाचंदेखील काहीसं असंच आहे. क्रोधित मनात अविचार येतात आणि त्यामुळे आपल्या विचारांचं मूळ प्रतिबिंब आपलं अस्तित्व गमावून बसतं आणि त्यामुळे नुकसान होतं. ज्यावेळी मन शांत होऊन अंतर्मन स्थिर होतं त्यावेळी आपले मूळ विचार परत प्रतिबिंबित होऊ लागतात.

प्रकाशाचे प्रतिबिंब आरशावर घेतले तर परावर्तित होणारा प्रकाश अंधार संपुष्टात आणतो. पूर्वीच्या काळी ज्या दुर्गम भागातून वीज पोहोचली नव्हती अशा ठिकाणी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी अंगणात आरसा ठेवून त्यावरून प्रकाशाचे प्रतिबिंब थेट घरात घेत असत. प्रकाशाच्या या परावर्तित प्रतिबिंबामुळे काळोखाचा परिसर उजळून निघत असे. त्यामुळे वातावरण अधिक प्रसन्न होऊन धार्मिक कार्यक्रमात ईश्वराचे अधिष्ठान प्राप्त होण्यास मदत होई. पूर्वीच्या काळी लोकांची असणारी कल्पकता दाद देण्यासारखी होती. प्रतिबिंबाचं एकूणच महत्त्व अनन्यसाधारण आहे. कॅमेऱ्याद्वारे समोर असणाऱ्या कोणत्याही सजीव-निर्जीव घटकांची प्रतिमा जशीच्या तशी प्रतिबिंबित करण्याचा शोध मनाला आनंद देणारा आहे. आपले प्रतिबिंब पाहण्याचा मोह सजीवांना सहजासहजी आवरता येत नाही. जीवनात प्रतिबिंबाला खूपच मोठे महत्त्व आहे. आपली प्रतिमा नेहमीच उत्तम दिसण्यासाठी मन स्वच्छ ठेवता येणं महत्त्वाचं आहे. हे ज्या व्यक्तींना शक्य होतं त्यांना स्वत:चे प्रतिबिंब पाहणं आणि ते दुसऱ्यांच्या मनावर उमटवणं सहज शक्य होतं.