‘रेगे’ चित्रपटातील अभिनेत्याला मारहाण

सामना ऑनलाईन । पुणे

‘रेगे’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील अभिनेता आरोह वेलनकर याला दारुच्या नशेत असलेल्या दोन व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांनी आरोहच्या गाडीचे देखील नुकसान केले आहे. याप्रकरणी त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आले आहे. आरोहने स्वतः या घटनेबाबतची माहिती फेसबुकवर पोस्ट केली आहे.  एखादी चुकीची घटना घडत असताना आपला समाज कशी बघ्याची भूमिका घेतो यावर त्याने या पोस्टमध्ये खंत व्यक्त केली आहे.

‘गुरुवारी मी पुण्यातील कलिंगा हॉटेलबाहेर रस्त्याच्या कडेला माझी गाडी पार्क करुन मी गाडीतच बसलो होतो. त्यावेळी एक सफेद रंगाची वेर्ना कार माझ्या मागे येऊन थांबली व सतत हॉर्न वाजवत होती. त्यामुळे मी माझी गाडी थोडी पुढे नेऊन उभी केली. मला वाटले आता मागची गाडी जाईल मात्र त्या गाडीतील व्यक्ती सतत हॉर्न वाजवत होती. थोडय़ा वेळाने त्या गाडीतील दोन व्यक्ती संग्राम व प्रवीण माझ्या जवळ आल्या व मला शिवीगाळ करु लागल्या.

गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करण्यावरुन ते मला बडबडत होते. ते प्यायलेले होते त्यामुळे सुरवातीला मी दुर्लक्ष केले. मात्र काही वेळानंतर मी गाडीबाहेर त्यानंतर त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी पुन्हा गाडीत बसलो तर ते माझ्या गाडी व काचांवर लाथा मारत होते. ते कुठल्यातरी पक्षाचे ‘पदाधिकारी’ होते. थोडय़ा वेळाने ते निघून गेले. त्यानंतर मी पोलिस स्थानकात गेलो. तेथे जात असताना त्याच दोन व्यक्ती आणखी एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे मी पाहिले. मी पोलिसांकडे त्या घटनेबाबत तक्रार केली.’ असे आरोहने फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.

त्या दोन व्यक्ती आरोहला मारहाण व शिवीगाळ करत असताना अनेक जण जमा झाले होते. मात्र कुणीही त्याच्या मदतीला आले नाही यावर त्याने त्याच्या पोस्टमधून खंत व्यक्त केली आहे. तसेच जर एखाद्यावर अन्याय होत असेल तर जमावाने बघ्याची भूमिका न घेता पुढे सरसावून त्याला मदत करावी, असे आवाहनही त्याने या पोस्टमधून केले आहे.