जाहिरात करताना विकासकांना महारेरा नोंदणी क्रमांक बंधनकारक

सामना प्रतिनिधी, मुंबई

गृहप्रकल्पांना महारेराअंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अशी नोंदणी न करताच ‘महारेरा नोंदणीकृत’ अशा जाहिराती करून ग्राहकांना फसवणूक केली जात आहे. अशा गृहप्रकल्पांत घर घेणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्षात प्रकल्प रेरात नोंदणीकृत नसल्याने कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यांचे कर्जच पास होत नसल्याची दखल गृहनिर्माण विभागाने घेतली असून गृहप्रकल्पांच्या जाहिराती करताना नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महारेराअंतर्गत अद्याप केवळ २०० प्रकल्पच नोंदणीकृत झाले आहेत. तर १२०० प्रकल्पांनी अर्ज केली असून त्यापैकी ११०० प्रकल्पांची नोंदणीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मात्र बऱ्याचशा गृहप्रकल्पांनी महारेरा नोंदणीकृत अशा जाहिराती करून ग्राहकांना भुलवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याची दखल गृहनिर्माण विभागाने घेतली आहे.