हत्येपूर्वी गौरी लंकेश यांच्या घराची रेकी, सीसी टीव्हीत संशयित मारेकरी कैद

सामना ऑनलाईन, बंगळुरू

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येपूर्वी संशयित मारेकऱ्यांनी त्यांच्या घराची रेकी केल्याचे सीसी टीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. गेल्या ५ सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांची हत्या अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून केली. त्याच दिवशी मोटरसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी त्यांच्या घराची रेकी केल्याचे सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या फुटेजमुळे गौरी यांच्या मारेकऱयांचा शोध घेणे एसआयटीच्या पोलिसांना अधिक सोपे होणार आहे.

३५ वर्षीय इसमाने पांढरा शर्ट, पॅण्ट आणि हेल्मेट घातले होते, असे या फुटेजमध्ये दिसत आहे. हत्या करण्यापूर्वी ही व्यक्ती गौरी यांच्या घराच्या दिशेने आली होती. गौरी यांच्या घराच्या पुढे काही अंतर गेल्यानंतर त्याने पुन्हा आपली मोटरसायकल मागे वळवली. ही व्यक्ती तिसऱ्यांदा जेव्हा घराजवळ आली त्यावेळी त्याच्या पाठीवर एक काळी बॅग होती. या बॅगमध्येच शस्त्र असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या हत्येची कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीकडून चौकशी करण्यात येत आहे.