बिल्डिंग

आपल्या घरातील ज्येष्ठांची काळजी आपणच घ्यायला हवी हे सांगणारी छोटीशी गोष्ट.

सुनंदा बागेत हिंडत होती. लेकीकडे आली की इथे फेऱया माराव्या, सूर्य-प्रार्थना, गणेश प्रार्थना करावी, मुले बागडताना जिवंत होणारी, सळसळणारी हिरवळ बघावी हे तिला बरसणाऱया मेघाइतके सुखदायी वाटे. ती अशीच होती. वरून अबोल पण मनातून खूप खूप बोलकी.

‘तुम्ही नव्या का?’ समोर पंचाहत्तीच्या आसपासचे गृहस्थ उभे होते.

‘तशी येते वर्षातून दोनदा चारआठ दिवस. लेक माझी. श्यामला पुरंदरे. समोर ग्लेन डेलमध्ये असते. आपण कुठे राहता?’

‘जुनी बिल्डिंग. ग्लेन डेलसारखं शानदार आमचं काही नाही, पण बिल्डिंग जुनी असली तरी मजबूत आहे.’

‘हं!’ मग रोजच ती जुनी बिल्डिंग भेटू लागली. आपणहून बोलू लागली. मनातलं सांगू लागली.

‘काल अख्खा दिवस बिल्डिंगला गळती लागलेली हो. रिपेअर करायला जावं तर अंगात ताकद नव्हती हो. आज येणारच नव्हतो. पण म्हटलं नेम चुकवायचा नाही. तुमचं दर्शन होतं. आनंद वाटतो.

ते तरातरा पुढे गेले. ती मात्र आश्चर्य करीत राहिली. बिल्डिंगला गळती लागायला हा काही पावसाळा नाही. अजून हवेत हवीवीशी गुलाबी थंडी आहे. बरं… ड्रेनेज पाइप फुटला का? फुटला तर एवढय़ा म्हाताऱया माणसाला का बरं तो दुरुस्त करायला पाठवावं? बिल्डिंगला तरुण सेक्रेटरी नाही? काय कमाल आहे या मुंबैकरांची!

यावेळी नातवाने फार आग्रह केला म्हणून ती आठऐवजी पंधरा दिवस राहिली,पण पुढे बागेत ते बिल्डिंगवाले दिसेचनात.

तिला काहीही कारण नसताना काळजी वाटू लागली. कुठं राहतात म्हणाले ते? जुनी बिल्डिंग! म्हणजे कोणती?

ही अख्खी वसाहतच तेवीस वर्षे जुनी आहे! म्हणजे तशी नवयौवनाच! इतक्यात चाकाची खुर्ची दुसऱया टोकाला बागेत दिसली. सुनंदा बघत राहिली. एक तेजस्वी तरुण स्त्र्ााr ती चाकाची खुर्ची ढकलत होती. सुनंदा थांबली. हळूहळू चाकाची खुर्ची जवळ आली.

सुनंदा अभावितपणे पुढे आली. ‘काय झालं?’

‘बिल्डिंग पडली. पार कचरा झाला बिल्डिंगच्या पायांचा! ही माझी सून भली म्हणून बिल्डिंगला चाकाच्या खुर्चीत कोंबलं नि गार्डनला आणलं. चला, तुमचं दर्शन झाला आता अख्ख्या बिल्डिंगचा दिवस आनंदात जाणार. नमस्कार.’ चाकाची खुर्ची पुढे सरकली.

सुनेनं नंतर त्यांना सूर्यप्रकाशात बसवलं. ती सुनंदाजवळ आली.

‘बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये होते माझे सासरे. कोणीतरी कपट केलं. त्यांच्यावर चोरीचा आळ आणला. सासरे दुखावले. कामावरून अपमानित होऊन परतावं लागलं ना! थोडा परिणाम झाला डोक्यावर. आपल्या शरीरालाच बिल्डिंग समजतात आता.’

‘त्यांची पत्नी?’ ‘निवर्तलीय.’

‘पण तू बघतेस! सांभाळ बिल्डिंगला. जुन्या बिल्डिंग सांभाळणारे तरुण हात असेच निर्मळ राहोत.’ सुनंदानं त्या तरुण मुलीचे हात चुंबिले आणि डोळे पुसत ती घराकडे वळली. जुन्या बिल्डिंग सांभाळत चला प्रिय तरुणांनो.