लोअर दुधनातून त्वरीत पाणी सोडा; अन्यथा तीव्र आंदोलन – आमदार डॉ. पाटील

2

सामना प्रतिनिधी । परभणी

सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यातील अनेक गावात उन्हाळयामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सततच्या दुष्काळामुळे व पाऊसमान कमी झाल्यामुळे नदी पात्र कोरडे व बोअरची पाणी पातळी खालावली असल्याने प्रत्येक गावात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातुन परभणी जिल्हयातील नदी पात्रात त्वरीत पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिला आहे.

या विषयी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी दुरध्वनीव्दारे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शनिवारी संपर्क साधला. व त्यांना लोअर दुधना प्रकल्पातुन परभणीसाठी १५ क्युबीक पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली असल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली.

परभणी विधानसभा मतदार संघातील टाकळी कुं., नांदापुर, खानापुर, मांडवा, जलालपुर, झरी, कुंभारी, वाडीदमई, हिंगला, सुलतानपुर, पिंपळा, सनपुरी आदी गावात नदीवरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत आहेत. परंतु सद्यस्थितीत सर्व नद्यांचे पात्र कोरडे पडल्यामुळे सदरील गावातील पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. यामुळे नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणे जीकरीचे झाले आहे. लोअर दुधना प्रकल्पातुन नदी पात्रात पाणी सोडण्याखेरीज या गावातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही. तीव्र पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांत शासन, प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाले आहे. सदरील गावांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी व पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातुन त्वरीत पाणी सोडण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिला आहे.