टीसीएसला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वात मोठी कंपनी

सामना प्रतिनिधी । मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीचे बाजारमूल्य ७.५१ लाख कोटी रुपये झाले असून तिने टाटा कन्स्टल्टेन्सी सर्विसेसलाही (टीसीएस) मागे टाकले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या कामगिरीचा हा उच्चांक आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स मंगळवारी २.३७ टक्क्यांनी वाढून ११७७ रुपये एवढे झाले. रिलायन्सच्या शेअरमध्ये एकूण २७.३० रुपयांची वाढ झाली. त्याचवेळी टीसीएसचे शेअर ०.७२ टक्क्यांनी घसरले आणि १९३०.०५ इतके झाले. टीसीएसच्या शेअरमध्ये १४ रुपयांची घसरण झाली. २०१३ साली टीसीएसने बाजारभावात रिलायन्सलाही मागे टाकले होते. चार वर्षांनंतर एप्रिल २०१७ मध्ये रिलायन्सने पुन्हा टीसीएसला मात दिली आहे. जानेवारी २०१८ साली टीसीएस ६.११ लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह पुन्हा एक क्रमांकाच्या स्थानावर पोचली.