शहिदांच्या मुलांच्या शिक्षण ,नोकरी आणि घरखर्चाची जबाबदारी रिलायन्सने स्वीकारली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांबाबत रिलायन्स फाऊंडेशनने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच शहिदांच्या मुलांच्या शिक्षण, नोकरी आणि घरखर्चाची जबाबदारीही रिलायन्स फाऊंडेशनने स्वीकारली आहे. शहीदांच्या कटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचेही रिलायन्स फाऊंडेशनच्या पत्रात म्हटले आहे. देशातील जनतेसोबत आम्ही उभे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जगातील कोणतीही शक्ती हिंदुस्थानची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला आव्हाने देऊ शकत नाही. या दुःखाच्या, गंभीर आणि संवेदनशील प्रसंगी एक नागरिक आणि संस्था म्हणून आम्ही लष्कर, सरकार आणि पाठिशी आहोत. आमच्या जबाबदारीची जाणीव ठेवत आम्ही आमचा खारीचा वाटा उचलणार आहोत. त्यामुळेच शहीद जवानांच्या मुलांचे शिक्षण ,नोकरी आणि घरखर्चाची जबाबदारी आम्ही स्वीकारणार आहोत. तसेच गरज भासल्यास आम्ही रुग्णालयांमध्ये जवानांना आवश्यक त्या आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहेत. सरकारने आम्हांला इतर कोणती जबाबदारी दिली, तर ती स्वीकारण्यासही आम्ही तयार असल्याचे फाऊंडेशनकडून सांगण्यात आले. रिलायन्स फाऊंडेशन ही रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक संस्था असून नीता अंबानी त्याच्या अध्यक्ष आहेत.