रिलायन्स जिओ प्राईमध्ये १५ एप्रिलपर्यंत सहभागी होता येणार

71

सामना ऑनलाईन । मुंबई

रिलायन्स जिओ प्राईम ही सेवा घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओमध्ये १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे. याआधी रिलायन्स जिओमध्ये नोंदणी करण्यासाठी ३१ मार्च २०१७ पर्यंतची मुदत होती. मात्र कंपनीने ही मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कंपनी सध्या ७.२ कोटी ग्राहकांना सेवा देत आहे आणि रिलायन्स जिओला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

कंपनीने जिओ समर सरप्राइज अशी नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे १५ एप्रिलपर्यंत जिओ प्राइमच्या ३०३ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या प्लॅनची खरेदी करणाऱ्या जिओ प्राईमच्या सदस्यांना आणखी ३ महिने विनामूल्य सेवा दिली जाणार आहे. त्यांनी भरलेले पैसे जुलै २०१७च्या प्लॅनमध्ये वळते करुन घेतले जाणार आहेत.

रिलायन्स जिओला मिळत असलेल्या प्रतिसादासाठी कंपनीच्यावतीने अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.

रिलायन्सने सप्टेंबर २०१६ मध्ये जिओ सेवा सुरू केली. सुरुवातीला ही सेवा मोफत देण्यात आली. मात्र १५ एप्रिल नंतर जिओ प्राइमचे सदस्य असणाऱ्यांना सवलतीच्या दरात आणि जिओ प्राइमचे सदस्य नसणाऱ्या ग्राहकांना थोड्या जास्त दराने जिओच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. जिओने ग्राहकांसाठी विविध ‘टॅरिफ प्लॅन’ जाहीर केले आहेत. यातील कोणताही प्लॅन निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना आहे. मात्र १५ एप्रिल पर्यंत जिओ प्राइमचे सदस्य होऊन ‘टॅरिफ प्लॅन’ निवडणाऱ्यांना जिओ प्राइमचे सदस्य नसणाऱ्यांच्या तुलनेत जास्त फायदा होणार आहे. जिओ प्राइमचे सदस्यत्व कंपनी ९९ रुपयांत देत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या