रिलायन्सचा बाजार‘भाव’ वाढला


सामना प्रतिनिधी , मुंबई

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) विक्रमी झेप घेतली आहे. हिंदुस्थानातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्सचे बाजार भांडवल तब्बल आठ लाख कोटींवर पोहोचले आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक बाजार भांडवल असलेली रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

गुरुवारी 1.27 टक्के वाढीने रिलायन्सच्या एका शेअरची किंमत 1 हजार 262 रुपयांवर पोहोचली आणि कंपनीचे बाजार भांडवल 8,00,001.54 कोटींवर गेले. सर्वाधिक बाजार भांडवलाच्या स्पर्धेत रिलायन्सने टीसीएसलाही आता मागे टाकले आहे. टीसीएसचे बाजार भांडवल 7 लाख 77 हजार 870 लाख कोटी इतके आहे.

11 वर्षांनंतर बाजार भांडवलात वाढ

तेलापासून टेलिकॉम मार्केट क्षेत्रात काम करणाऱया रिलायन्सने तब्बल एक वर्षानंतर बाजार भांडवलात 100 अरब डॉलरचा आकडा पार केला आहे. रिलायन्सच्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन मुकेश अंबानी यांनी 2025 पर्यंत रिलायन्सच्या दुप्पट विस्ताराचे लक्ष ठेवले आहे.

एका वर्षात शेअर्सही 60 टक्क्यांनी वाढले

रिलायन्सच्या शेअर्समध्येही एका वर्षात 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. या काळात टीसीएसच्या शेअरमध्ये 63 टक्क्यांची वाढ दिसत होती. यादरम्यान निफ्टीमध्ये झालेल्या 18 टक्के वाढीत रिलायन्सच्या शेअर्सचा फार मोठा वाटा होता.

काय आहे बाजार भांडवल

बाजार भांडवल म्हणजे शेअर बाजारात त्या कंपनीचे असलेले मूल्य. कंपनीच्या एका शेअरची किंमत गुणिले शेअर्सची एकूण संख्या यावरून त्या कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्य कळते.