काँग्रेसच्या नेत्यावर रिलायन्स ठोकणार ५ हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

सामना ऑनलाईन, मुंबई

अनिल अंबानी यांच्या ताब्यात असलेल्या रिलायन्स उद्योगसमूहाने काँग्रेसचे नेते आणि प्रख्यात वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याविरोधात ५ हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. रिलायन्स विरोधात खोटी, बदनामी करणारी विधाने केल्याने हा दावा ठोकण्यात येणार आहे. सिंघवी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर टीका करताना केंद्र सरकार कोट्यवधींची कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपतींची कर्ज माफ करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला होता. जेटली लोकांना मूर्ख बनवत असून सरकारने मोठ्या उद्योगसमूहांवरील १.८८ लाख कोटींची कर्ज माफ करण्याची तयारी सुरू केली असल्याचं सिंघवी यांचं म्हणणं होतं. याच आरोपांदरम्यान त्यांनी अप्रत्यक्षरित्या रिलायन्स समूहालाही याचा लाभ होणार असल्याचं म्हटलं  होतं.

सिंघवी यांनी आरोप करताना म्हटलं होतं की देशातील प्रख्यात ५० कंपन्यांवर ८.३५ लाख कोटींचं कर्ज आहे. या कंपन्यांमध्ये रिलायन्स समूह, अदानी आणि एस्सार समूहाचा समावेश अल्याचं ते म्हणाले होते. याचवेळी त्यांनी रिलायन्सचं नाव न घेता म्हटलं होतं की या तीन कंपन्यांपैकी एक असलेल्या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने गाशा गुंडाळणार असल्याचं जाहीर केलं आहे, या कंपनीवर ४५ हजार कोटींचं कर्ज आहे. याच टीकेमुळे सिंघवी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी रिलायन्स समूहाने केली आहे.