पैठणच्या धार्मिक सोहळ्याची मिरवणुकीने सांगता

सामना ऑनलाईन । पैठण

दक्षिण काशी पैठण येथे संभाजीनगरच्या वेद प्रतिष्ठान व पैठणच्या वेदाचार्य समितीतर्फे भव्य धार्मिक सोहळा पार पडला. १११ वेदपंडितांनी एकसुरात वेदपठण करून जगन्नियंत्याकडे विश्वकल्याणाची विनवणी केली. देशभरातील वेदशास्त्रसंपन्न पुरोहितांनी यात सहभाग घेतला. अध्यात्म क्षेत्रातील दिग्गजांची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढून या धर्मसोहळ्याची सांगता करण्यात आली.

दक्षिण काशी पैठण नगरीत वर्षाच्या अखेरच्या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या सप्ताहात देशातील एकमेव ठरलेला शतकोत्तर चतुर्वेद पारायण व यजुर्वेद स्वाहाकार यज्ञ सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात २९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसांत झाला. या सोहळ्यास देशभरातून वैदिक अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उत्सवात ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा व दासबोध या राष्ट्रीय ग्रंथांच्या पारायणास हजारो भक्तांनी हजेरी लावली. तर यजुर्वेद स्वाहाकार व शतकोत्तर चतुर्वेद स्वाध्याय यज्ञाचा कार्यक्रम पार पडत असतांना मंत्राच्या पठणाने माहेश्वरी भक्त निवास दुमदुमले. वैदिक पंडित यशवंत पैठणे, दत्तात्रय पोहेकर, डॉ. अशोक देव, नारायणदेव सुलाखे, सदाशिव मोकाशी, श्रीनिवास कुलकर्णी, कमलाकरगुरू शिवपुरी, रेणुकादास गर्गे, कृष्णकांत मुळे, चंद्रकांत महेशपाठक, सतीश वागेश्वरी, विजयकुमार पल्लोड, प्रमोद आपेगावकर, अनंत खरेभट, सार्थक शिवपुरी यांच्या वेदपठणाने तथा मंत्रघोषाने उपस्थितांचा उत्साह वाढला. या उत्सवात १११ विद्वान पंडितांनी त्यांच्या आगळ्यावेगळ्या सुरात वेदपठण करून उपस्थितांना सुखद धक्का दिला. तर वेदपठणाच्या कार्यक्रमास पैठणकरांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्याची सांगता मिरवणुकीने झाली.

मिरवणुकीत प्रसाद महाराज अंमळनेरकर, मुक्तानंद सरस्वती ऊर्फ काशीकर स्वामी, रावसाहेब गोसावी, प्रफुल्ल तळेगावकर, नाना महाराज जोशी हे रथात विराजमान होते. मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. शेकडो भक्तांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा व दासबोध ग्रंथ घेऊन सहभाग नोंदविला. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराजांच्या गजराने यावेळी पैठणनगरी दुमदुमून गेली.

हा सोहळा डॉ. अशोक देव, अनिल सराफ, दत्तात्रय पोहेकर, अ‍ॅड. अशोक शेवतेकर, अ‍ॅड. प्रभाकर वैद्य व अंजली शेवतेकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. उत्सव यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी, महेश जोशी, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पोहेकर, प्रसाद भागवत, रमेश पाठक, गणेश साळजोशी, विनायक निरखे, योगेश चक्रे, संतोष नाईक, प्रदीप खिस्ती, सौरभ पोहेकर, योगेश चक्रे, बंडेराव जोशी, सखाराम भागवत, श्रीनाथ जोशी, प्रदीप महेशपाठक यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परीश्रम घेतले.

आमदार भुमरे यांची उपस्थिती

उत्सवाच्या सांगता कार्यक्रमास आमदार संदिपान भुमरे, उपनगराध्यक्षा सुचित्रा जोशींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रसाद महाराज अंमळनेरकर म्हणाले की, वेद हे जीवन घडविणारे ज्ञान आहे. पण ते प्राप्त करून घेण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. ज्याला वेदांचे ज्ञान प्राप्त झाले. त्याचे जीवन कल्याणमय होते. हे महिला व पुरुषांनी विसरता कामा नये. जीवनाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर वेद विद्यापीठ बना, असेही समारोपप्रसंगी सांगितले.