मोठी बातमी, ‘हिमालय’ पूल आता दिसणार नाही

himalay-bridge

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला जोडणारा हिमालय पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले होते. गुरुवारी रात्री 7:30 च्या सुमारास ही घटना घडली. यानंतर आता हा संपूर्ण पूलच आज संध्याकाळपर्यंत काढून टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालय पूल कोसळल्यानंतर रस्त्यावरील डेब्रीज हटवण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते. पूल कोसळताच दादाभाई नौरोजी मार्गावरील वाहतूक जे. जे. उड्डाणपूल आणि सीसीएमटी या दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक वळवण्यात आली. अद्यापही हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

गुरुवारी रात्रीपासून डेब्रीज हटवण्याचे काम महापालिकेने सुरू केले होते. पहाटेपर्यंत कोसळलेल्या पूलाचा उर्वरित सिमेंटचा स्लॅब काढण्यात आला. स्लॅब काढल्यानंतर जमा झालेला मातीचा ढिगारा हटवण्यात आला. शुक्रवारी पहाटे चारपर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतर पुलाचे स्लॅब काढण्यात आले. त्यामुळे आता या जागी पुलाचा केवळ सांगाडा शिल्लक आहे. आता हा सांगाडा देखील काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुलाचा भाग कोसळल्यामुळे सीएसएमटी स्थानकातून ते टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय, अंजुमन-ए-इस्लाम शाळेच्या दिशेने येण्यासाठी पादचाऱ्यांसाठी पर्यायी मार्गदेखील तयार करण्यात आला आहे. रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकाचा काही भाग काढण्यात आला आहे. या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग आखण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या घटनेतील जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देखील त्यांनी यावेळी दिले.

पूल दुर्घटनेमुळे ऑडिटवरच प्रश्नचिन्ह, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश