हिंदुस्थानात तब्बल १५०० लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विश्वाची उत्पत्ती नेमकी कशी आणि कधी झाली याबाबत माणसाचे कुतूहल पूर्वीपासून कायम आहे. शास्त्रज्ञ हे कुतूहल संपवण्यासाठी अनेक संशोधन करत असतात. अशाच एका शोधमोहिमेमध्ये हिंदुस्थानमध्ये १५०० लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. हिंदुस्थानमध्ये आतापर्यंत सापडलेले हे सर्वात जुने जीवाश्म असल्याचे बोलले जात आहे, मात्र याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही.

गुजरातमधील कच्छच्या वाळवंटामध्ये हिंदुस्थान आणि जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनामध्ये हा शोध लागला आहे. शोधमोहिमेमध्ये सापडलेला जीवाश्म समुद्री प्रजातीचा आहे. या जीवाश्माची लांबी ५.५ मीटर आहे. या शोधामुळे त्या काळातील वातावरण आणि अन्य काही प्रकृतीचे राज उघड होण्याची शक्यता आहे.

कच्छमध्ये शोधमोहिमेवर असलेल्या संशोधकांच्या एका पथकाला जीवाश्माचे काही अवशेष सापडले. त्यानंतर या भागात तब्बल १५०० तास काम केल्यानंतर संपूर्ण जीवाश्माचा शोध घेण्यात संशोधकांना यश आले. सापडलेला जीवाश्म समुद्रातील शार्क माशासारखा आहे. याचा काळ २५०० ते ९०० लाख वर्षापूर्वीचे असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. या संशोधकांच्या पथकाचे नेतृत्व दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक गुंटुपल्ली व्ही. आर. प्रसाद करत आहेत.