शायरीच्या बादशाहाला गुगल डूडलचा सलाम

सामना ऑनलाईन । मुंबई

शेर- ओ -शायरीचा बादशाहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिर्झा गालिब यांच्या २२० व्या जयंतीनिमित्त गुगलने डूडल साकारले आहे. गूगलने डूडलच्या माध्यमातून मिर्झा गालिब यांना मानवंदना दिली आहे. या डूडलमध्ये गालिब यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. मावळतीचा सूर्य, मशिद, आणि गालिब असे सुंदर चित्र गुगलने रेखाटले आहे. डूडलच्या मध्यभागी हातात लेखणी आणि कागद घेतलेल्या गालिब यांचे चित्र साकारण्यात आले असून ते शायरी करण्यात रमलेले दिसत आहेत.

२७ डिसेंबर १७९७ रोजी आग्र्यातील काळा महाल येथे मिर्झा गालिब यांचा जन्म झाला. मिर्झा असल-उल्लाह बेग खां असे त्यांचे संपूर्ण नाव. गालिब हे प्रसिद्ध पारसी आणि उर्दू कवी होते. गालिब चार वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आजोबा व काकांनी त्यांचा सांभाळ केला. वयाच्या ११व्या वर्षापासून ते शेर लिहीत होते. त्यांनी पारसी भाषेत जवळपास १८००० पेक्षा जास्त शायरी रचल्या आहेत. शिवाय त्यांनी उर्दू भाषेतही अनेक शायरी लिहिल्या आहेत.

मिर्झा गालिब यांना कधीच प्रसिद्धी मिळवण्याची गरज वाटली नाही. ”माझ्या मृत्युनंतरही मी केलेल्या शायरी अजरामर राहतील. शिवाय त्यांची प्रसिद्धीही आपोआपच होईल, असा त्यांचा ठाम विश्वास होता”. त्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा एक हिंदी चित्रपट १९५४ साली साकारण्यात आला होता. १९८८ मध्ये मिर्झा गालिब यांच्या जीवनावर अजून एक चित्रपटही प्रदर्शित करण्यात आला.

वयाच्या १३ व्या वर्षी उमराव बेगम यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. विवाहनंतर ते पत्नीसह दिल्लीतच स्थायिक झाले. इश्क, मोहब्बत, वफा, लफ्ज… अशा बऱ्याच शब्दांमधून जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या गालिब यांचे निधन वयाच्या ७१ व्या वर्षी म्हणजे १५ फेब्रुवारी १८६९ ला दिल्लीतील चांदनी चौक भागातील गली कासिम जानमध्ये झाले. गालिब मिर्झांच्या निधनानंतर त्या भागाला ‘गालिब की हवेली’ या नावाने ओळखले जाते.