रेमो डिसोजाने दिले व्हॅलेन्टाईन स्पेशल ‘गावठी’ गिफ्ट

सामना ऑनलाईन । मुंबई

व्हॅलेन्टाईन डे जवळ येतो तसे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बाजारात अनेक गोष्टी येतात. प्रत्येक व्हॅलेन्टाईन दिवशी काहितरी खास गिफ्ट किंवा नवीन काहितरी करण्याचे मनसुबे आखले जातात. पण, यंदाच्या व्हॅलेन्टाईनला सुप्रसिद्ध नृत्य आणि सिने दिग्दर्शक रेमो डिसोजाने एका विशेष संगीतमय नजराण्याचे अनावरण केले आहे. हा नजराणा म्हणजे आगामी येणाऱ्या ‘गावठी’ या चित्रपटातील एक रोमँटीक गाणे आहे. ‘दिसू लागलीस तू’ हे अश्विन भंडारे यांनी संगीत आणि स्वरबद्ध केलेले प्रेमगीत एका दिमाखदार सोहळ्यात रेमो डिसोजा यांनी व्हॅलेन्टाईन डे स्पेशल गिफ्ट म्हणून तरुणाईला समर्पित केले.

गावठी चित्रपटाचे पटकथा लेखक तसेच दिग्दर्शक आनंदकुमार (ॲन्डी) हे गेली पंधरा वर्षे रेमो डिसोजा यांचे सहायक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या प्रेमगीताच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला रेमो आपली पत्नी लीझल हिच्या सोबत उपस्थित होता. या गाण्याचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईच्या जे. डब्ल्यु. मॅरीएट या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.