आधी गाळ काढून खाडय़ा मोकळय़ा करा!

-पंढरीनाथ सावंत

कोकणातील खाडय़ांमध्ये मोठय़ा भरतीच्या वेळा सोडल्यास कॅरामरानसारख्या हवेच्या उशीवर चालणाऱया बोटीही चालू शकणार नाहीत. त्यांच्या उशा गाळ पकडून ठेवील. बंदरेसुद्धा इतक्या दूरपर्यंत गाळाने भरली आहेत की, कॅरामरानसुद्धा थेट बंदरात येणार नाही. होडय़ा वापराव्या लगातील. हे पाहता प्रश्न असा तयार होतो की, गाळ काढून खाडय़ा नि मुखाजवळची बंदरे मोकळी करणार का? तसे केले तरच जलवाहतूक चालेल.

या आठवडय़ात अशी एक सुखस्वप्नपाडू बातमी मराठी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. जिच्यामुळे कोकणातील लोकांच्या तोंडाला पाणी सुटले असेल. बातमी अशी आहे.

“राज्यात चार ठिकाणी लवकरच नद्यांतून वाहतूक,प्रकल्प अहवाल तयार; निविदा मागवणार”

याचा अर्थ असा की, कोकणातल्या चार नद्यांमध्ये अंतर्गत वाहतूक सुरू होणार. प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. निविदा मागवण्याची लग्नघटका भरत आली आहे. ज्या चार नद्यांमध्ये ही वाहतूक चालणार आहे त्यापैकी तीन रायगड जिल्हय़ामधल्या आहेत आणि चौथी रत्नागिरी जिल्हय़ामधली आहे. रायगडमधल्या अंबा, कुंडलिका, सावित्री आणि रत्नागिरीमधली चिपळूणची वशिष्ठाr.

ही बातमी वाचणाऱया बऱयाच माणसांना वाटेल की, या नद्यांमध्ये वाहतूक पहिल्यानेच सुरू होत आहे. तशी स्थिती नाही. प्रथम लक्षात घेतले पाहिजे की, या नद्यांच्या ज्या अंतरात जलवाहतूक चालू होणार आहे ती अंतरे म्हणजे खाडवा – नदीच्या मुखापासून वर जेथपर्यंत खारे पाणी जाते तेथपर्यंतचे अंतर. या वरच्या टोकाला शेवटचे जमिनीवरचे बंदर तर मुखापाशी सागरी बंदर. या खाडय़ांमधून शेकडो वर्षांपासून शिडांच्या मचव्यांमधून माल आणला व नेला जात असे. त्यामुळे खाडीच्या वरच्या बाजूला बंदरे आणि मोठय़ा बाजारपेठा झाल्या.

वशिष्ठाrवर चिपळूण हे बंदर आणि मोठय़ा बाजारपेठेचे शहर. सागरी बंदर दाभोळ. सावित्रीवर महाड, मुखापाशी बाणकोट. अंबानदीवर नागोठणे व धरमतर – मुखापाशी रेवस, कुंडलिकेवर रोहा आणि रेवदंडा अशी बंदरे होती. आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या वरच्या बंदरांशी अनेक घाटमार्ग संलग्न होते. त्यामुळे घाटावरचा माल बाहेर व बाहेरचा घाटावर जाण्याची ही केंद्रे बनली होती. (धरमतर – पेण – खेड – पाली हा रस्ता जुन्या बोरघाटाला मिळत होता. त्यावर तुकाराम महाराजांनी खोपोलीजवळ बोंबल्या विठोबा स्थापन केला. तो अजून आहे. त्याची आषाढी कार्तिकी जत्रा भरत असते.

या नद्यांवर शिडाच्या गलबतीप्रमाणेच लहान मोठय़ा लाँचेस येत होत्या. सावित्रीवर दासगावला लाँच येत होती. रेवस, रेवदंडा, बाणकोट, दाभोळ या सागरी बंदरांना पी ऍण्ड ओच्या आणि शेवटी चौगुल्यांच्या कोकणसेवक – रोहिणी – सरिता  या तीन सागरगामी बोटी चालत होत्या.

ही सगळी आतली – बाहेरची वाहतूक बंद का झाली? त्याचे कारण प्रत्येक नदीचे वेगळे असणे शक्य नाही. ते जे काही आहे ते शोधून काढून नाहीसे केल्याशिवाय तिथे पुन्हा जलवाहतूक चालू शकणार नाही. ते कारण साधे आहे. या खाडवा भरतीच्या वेळी तुडूंब भरलेल्या दिसतात खऱया, पण त्यामध्ये शिडाच्या किंवा इंजिनावर चालणाऱया जलवाहनांचा तळ गाळात बुडणार नाही एवढे खोल पाणीच उरले नाही. धरमतरला बिर्लांच्या कंपनीला त्यांची सपाट तळाची गलबतेसुद्धा आणण्यासाठी गाळ काढून ‘कॉरिडॉर’ तयार करावी लागली आणि ती तशीच राहावी यासाठी नेहमी उपाय करावे लागतात. याच खाडीवरचे रेवस बंदर गावाला खेटून होते. त्याचा धक्का समुद्रात मैल दीड मैल आत गेला आहे. तेथवर लाँच येते. तिथून  ‘होडी’ने बंदरात यायचे.

या कारण म्हणजे या खाडय़ा गाळाने इतक्या ओतप्रोत भरल्या आहेत की, त्यामुळे भरतीच्या वेळी त्यांचे पाणी भातशेतीत शिरते. त्याचे प्रमाण सारखे वाढत आहे. खार जमिनीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 16 लाख एकर खार जमीन तयार झाली आहे. पूर येतात तेव्हा शेजारच्या गावांमध्ये पाणी शिरते. 1983, 1981, 2005 यावर्षी झालेल्या अतिवृष्टीला भरतीची जोड मिळाल्याने चिपळूण, महाड, रोहा, नागोठणे या गावांमधल्या अनेक घरांच्या आढय़ांना पाणी लागले होते. अपरंपार नुकसान झाले होते.

आज या खाडय़ांमध्ये मोठय़ा भरतीच्या वेळा सोडल्यास कॅरामरानसारख्या हवेच्या उशीवर चालणाऱया बोटीही चालू शकणार नाहीत. त्यांच्या उशा गाळ पकडून ठेवील. बंदरेसुद्धा इतक्या दूरपर्यंत गाळाने भरली आहेत की, कॅरामरानसुद्धा थेट बंदरात येणार नाही. होडय़ा वापराव्या लगातील. हे पाहता प्रश्न असा तयार होतो की, गाळ काढून खाडय़ा नि मुखाजवळची बंदरे मोकळी करणार का? तसे केले तरच जलवाहतूक चालेल. आणि निघणाऱया अब्जावधी टन गाळाचे काय करणार?