ट्रोल करणाऱ्याविरोधात रेणूका शहाणेंनी केली पोलिसात तक्रार

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री रेणूका शहाणे ही सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा सामाजिक विषयांवर ती आपलं मत मांडत असते. अनेकदा यावरून त्यांना ट्रोलही केलं गेलं आहे. या मंगळवारीही एका ट्विटर युजरने रेणूका शहाणे यांच्या गांधीजींवरील पोस्टवर शिवीगाळ करणारी प्रतिक्रिया दिली. मात्र यावेळेस रेणूका यांनी शांत न राहता यो ट्रोलरविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.

रेणूका शहाणे यांनी महात्मा गांधी यांना नमन करणारे ट्विट केले होते. त्यात त्यांनी नथुराम गोडसे यांनी गांधीजींच्या हत्या केल्याचाही उल्लेख केला होता. या ट्विटवर अनेकांनी रेणूका शहाणे यांना ट्रोल केले मात्र यात पिंटू नामक एका व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत रेणूका शहाणे यांना काही गोष्टी सुनावल्या. मात्र यावेळी त्यांनी शांत न राहता थेट वर्सोवा पोलिस ठाणे गाठत चिंटू विरोधात तक्रार नोंदविली आहे. “याप्रकरणी ट्रोल करणाऱ्या व्यक्तीविरोधात महिलेचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत आहोत”, असे पोलीस उपायुक्त परमजित दहीया यांनी सांगितले.

“एखाद्याला सोशल मीडियावर ट्रोल करणे हे अत्यंत चुकीचे आहे. स्वत:चे खरे रूप लपवून खोट्या फोटो आणि नावाने जनतेला त्रास देणाऱ्या अशा भेकड लोकांविरोधात कधीतरी आपल्याला आवाज उठवायलाच हवा. हे ट्रोलर्स त्यांचा खरा चेहरा कधीच समोर येऊ देत नाहीत आणि त्याचाच फायदा घेत आपल्याला ट्रोल करतात”, असे रेणूका शहाणे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे.