झुम बराबर झुम शराबी… देशात दारू पिणाऱ्या सरासरी प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला व्यसन

alcohol-new-study-report

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालातून दारूच्या व्यसना संदर्भात नवीन आकडेवारी समोर आली आहे. दारूचे व्यसन असणाऱ्यांची वाढती संख्या ही देशातील नागरिकांचे आरोग्य आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी चिंतेची बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानुसार, देशात 10 ते 75 वर्ष वयातील 16 कोटी लोकांना दारूचे व्यसन आहे. हा आकडा एकूण लोकसंख्येच्या 14.6 टक्के आहे. महत्वाचे म्हणजे यापैकी 5.7 टक्के लोकांना दारूच्या व्यसनामुळे गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. दारुच्या व्यसनात पुरुषांची संख्या मोठी आहे. महिलांपेक्षा व्यसनी पुरुषांची संख्या 17 टक्क्यांनी अधिक आहे.

राज्यांचा विचार केला तर छत्तीसगड, पंजाब, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये दारूचे व्यसन असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे सर्वेक्षण राष्ट्रीय व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. अतुल अंबेकर यांच्या देखरेखीत करण्यात आले आहे. ज्याचा अहवाल सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला.

सरकारकडून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार, दारूच्या खालोखाल देशभरात भांग, कोकेन आणि अन्य अंमली पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणावर केले जाते. दारूचे व्यसन असलेल्या सरासरी 38 लोकांपैकी कोण्या एकाला तरी उपचार घेण्याची सूचना दिली जाते. तर सरासरी 180 व्यसनींमागे एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये भरती आहे. दारू पिणाऱ्यांपैकी सरसरी प्रत्येक तिसरा व्यक्ती दारूच्या आहारी गेला आहे. हे सर्वेक्षण देशातील 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशात करण्या आले आहे. या सर्वेक्षणात राष्ट्रीय स्तरावर 186 जिल्ह्यात 2,00,111 घरांशी संपर्क साधण्यात आला आणि 4,73,569 लोकांसोबत संवाद साधण्यात आला आहे.