१० तासांच्या प्रयत्नांनंतर विहीरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

सामना प्रतिनिधी । राहुरी

भक्षाच्या शोधात विहीरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्याचे ऑपरेशन १० तासाच्या प्रयत्नांनंतर आज शनिवारी दुपारी यशस्वी झाल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करत वनविभागाच्या अधिकारी व कामगारांच्या मोहिमेचे स्वागत केले.

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील पुंजा भागवत मुसळे यांच्या शेती गटनंबर १३ / २ मध्ये असलेल्या विहीरीत गुरूवारी रात्री २ वर्षाचा नर बिबट्या पडला होता. या विहीरीला ४ फूट खोल असलेल्या कपारीत या बिबट्याने आश्रय घेतल्याने ही घटना कुणाच्याही लक्षात आली नव्हती. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शेतकरी पुंजा मुसळे यांचा शेतमजुर विहीरीत मासे पकडण्यासाठी उतरला असता कपारीत बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडली. कपारीत बिबट्याला पाहताच जिवाच्या भितीने शेतमजुर विहीरीतून बाहेर आला.

यावेळी विहीरीजवळ बसलेल्या मुसळे यांना कपारीत बिबट्या असल्याची माहिती शेतमजुराने दिल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांंना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. राहुरीचे वनक्षेत्रपाल एम.बी.पोकळे, वनपाल साहेबराव भालेकर, सचिन गायकवाड, जी.एन.लोंढे, एम.एल.मोरे, वनमजुर लक्ष्मण किणकर यांनी घटनास्थळी जावुन क्रेनला पिंजरा लावुन बिबट्याला विहीरीतुन बाहेर काढण्याचे काम सुरू केले. माञ विहीरीच्या कपारीत बिबट्या दडुन बसल्याने शुक्रवारची सायंकाळ पर्यंत राबविलेली मोहिम अयशस्वी ठरली. शुक्रवार राञी अंधारामुळे ही मोहिम थांबविण्यात आली होती.

आज शनिवारी सकाळी मुसळे यांच्या शेती लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या विहीरीतील पाणी बिबट्या पडलेल्या विहीरीत सोडुन कपारी पर्यंत विहीर पाण्याने भरविण्याचा प्रयोग राबविण्यात आला. विहिरीच्या कपारीत पाणी शिरताच बिबट्या बाहेर पडुन वनविभागाच्या पिंजऱ्यांत जेरबंद झाला. विहीरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी सुरू झालेले वनविभागाचे ऑपरेशन १० तासाच्या प्रयत्ना नंतर यशस्वी झाले.

या घटनेची खबर वाऱ्यांसारखी परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. पिंजऱ्यांत जेरबंद झालेल्या या बिबट्याला राहुरी वनविभागाच्या डिग्रस नर्सरीत हलविण्यात आले आहे. या नर्सरीत बिबट्याचा २ दिवस मुक्काम राहणार असून नंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे. ऊसाची शेती तसेच पाण्याची उपलब्धता असल्याने रहाण्यासाठी सुरक्षित ठिकाण व खाण्यासाठी भक्ष्याची सोय होत असल्याने राहुरी तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे.