२ लाख कोटींचा आरक्षण घोटाळा, जानकरांच्या आरोपामुळे भूकंप

सुनील उंबरे, पंढरपूर

राज्यामध्ये आत्तापर्यंत झालेले सगळे घोटाळे फिके पडतील असा अतिमहाघोटाळा आदिवासी विभागात झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्याची सुरुवात ३८ वर्षांपूर्वी सुरू झाली असून हा घोटाळा आता २ लाख कोटींचा झाल्याचा आरोप आहे. हा घोटाळा आरक्षणाचा असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य उत्तम जानकर यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये काही आकडेवारी आणि माहिती अधिकारात मागवलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. जानकर यांनी म्हटलं आहे की 1981 ते 2011 सालापर्यंत राज्यातील आदिवासींची संख्या ही 80 लाख इतकी  असल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये तब्बल 19 लाख 50 हजार आदिवासी बोगस असल्याचं जानकर यांचं म्हणणं आहे. बोगस आदिवासींची वाढीव लोकसंख्या दाखवून या घोटाळेबाजांनी राजकीय, शैक्षणिक, नोकऱ्या आणि विकास निधीच्या रकमेत मोठा घोटाळा केल्याचं जानकरांचं म्हणणं आहे.

आदिवासी समाजात 200 जातीचा समावेश आहे. महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत ज्यात  आदिवासी जातींचे अस्तित्व नाही.  अस्तित्व नसलेल्या अशा जिल्ह्यात आदिवासींची बोगस लोकसंख्या दाखवण्यात आली. याचं उदाहरण देताना त्यांनी
सोलापूर जिल्ह्याचंच उदाहरण दिलं. जानकर यांचं म्हणणं आहे की सोलापूर जिल्ह्यात 80 हजार आदिवासी समाज असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. माहितीच्या अधिकारात जी माहिती मिळाली त्यानुसार या जिल्ह्यात फक्त 7300 इतके आदिवासी आहेत. याचाच अर्थ तब्बल 72700 आदिवासी हे कागदावर असून प्रत्यक्षात ते नाहीच. जानकर यांनी मागणी केली आहे की या घोटाळ्याची सीबीआय द्वारे चौकशी झाली पाहीजे.

धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करावा अशी जानकर यांची मागणी आहे. बोगस पद्धतीने आदिवासी समाजाची आकडेवारी फुगवून दाखवल्याने धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करता येत नाहीये. त्यामुळे हा घोटाळा उघडकीस आणावा आणि बोगस लोकांना आदिवासी समाजातून हद्दपार करावं आणि धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करून घ्यावं असी मागणी जानकर यांनी केली आहे.

  • vasant

    this information is not in any other news paper .It is great news but may be a fact or NOT