निवडणूक कार्यातील राखीव कर्मचार्‍यांना अजूनही भत्ता वाटप नाही

1

सामना प्रतिनिधी । सेलू

तालुक्यातून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीसाठी राखीव असलेल्या कर्मचार्‍यांना काम करूनही अजून देखील भत्ता वाटप न झाल्याने कर्मचार्‍यांनी जावे तरी कुणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सेलू तहसील कार्यालयात याबाबत कर्मचारी विचारायला जात आहेत. परंतु कुणीही कर्मचार्‍यांना ठोस उत्तर देत नसून जिंतूर तहसीलकडे बोट दाखवत असल्याने आता कर्मचार्‍यांना पुन्हा भत्ता मिळवण्यासाठी जिंतूरला चकरा माराव्या लागतात की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सेलू तालुक्यातून अनेक शिक्षक कर्मचारी लोकसभा निवडणूकीच्या कामासाठी घेण्यात आले. यामध्ये २ प्रशिक्षण जिंतूर येथे झाल्यानंतर १७ एप्रिल रोजीच्या प्रशिक्षणात अनेक महिला शिक्षिका कर्मचार्‍यांना राखीव ठेवण्यात आले. परंतु ऐन मतदानाच्या दिवशी १८ एप्रिल रोजी अनेक महिला शिक्षकांना वेगवेगळ्या बुथवर प्रशासनाच्या वतीने काम करण्यास सांगितले. पूर्ण दिवस या महिला शिक्षिकांनी काम केले. परंतु जेव्हा मतदानानंतर सायंकाळी कर्मचार्‍यांना भत्ता वाटप करण्यात आला. त्यावेळी ज्यांना आधीच आदेश होते, अशांनाच भत्ता देण्यात आला.

निवडणुकीच्या कामाचे आदेश शाळेवर तत्परतेने पाठविण्यात आले. त्यानंतर सर्व कर्मचारी प्रशिक्षणाला जिंतूर येथे देखील गेले. निवडणुकीचे काम केलेल्या कर्मचार्‍यांना मतदानाच्या दिवशीच भत्ता मिळाला परंतू राखीव कर्मचार्‍यांनी मात्र काम करूनही आता कुणाकडे पाहावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेलू तालुक्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची विशेषतः महिला कर्मचार्‍यांची जिंतूर तहसील मध्ये जाऊन भत्ता आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडणार आहे. त्यात सध्या उन्हाचा तडाखा जोरात जाणवत असतांना महिला कर्मचार्‍यांनी आता जिंतूर तहसील ला भत्ता घेण्यासाठी जायचे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. हे म्हणजे गरज सरो अन् वैद्य मरो असाच प्रकार कर्मचार्‍यांच्या बाबतीत झाला आहे. कारण या राखीव कर्मचार्‍यांनी काम करूनही महिला कर्मचार्‍यांना भत्ता मिळण्यासाठी चकरा माराव्या लागणार असल्याचेच चित्र दिसत आहे. यामुळे तातडीने महिला कर्मचार्‍यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने राखीव महिला कर्मचार्‍यांना भत्ता देण्यात यावा अशी मागणी होत आहे.

जिंतूर तहसीलकडे

राखीव कर्मचारी मात्र काम करूनही भत्ता न मिळल्याने नाराज होते. मतदानानंतर दोन दिवस सुट्ट्या आल्याने कुणाचा कुणालाच मेळ लागला नाही. आज सोमवारी जेव्हा काही कर्मचार्‍यांनी सेलू तहसील कार्यालयात राखीव कर्मचार्‍यांच्या भत्ता बाबत विचारणा केली असता, त्यांना सरळ ‘जिंतूर तहसीलकडे’ जा असे सांगण्यात आले. एक तर भत्ता मिळाला नाही आणि आज चौकशी केली असता जिंतूर तहसीलला जा असे सांगण्यात आल्याने कर्मचार्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे.