उल्हासनगरातील रहिवासी, व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही – डॉ. श्रीकांत शिंदे

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

विकासाच्या नावाने उल्हासनगरवासीयांच्या रोजीरोटीवर नांगर फिरवणाऱ्या डीपीविरोधात शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाच मॅरेथॉन बैठका घेतल्या असून येथील रहिवासी आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व आमदार कॅबिनेटमध्ये आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

शिवसेना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी यांच्या पुढाकाराने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गाऊन बाजार आणि जीन्स बाजार कॅम्प नंबर ५, जापानी बाजार कॅम्प नंबर २, शिवशंकर शिवाजी चौक ते स्टेशन रोड बाजार असोसिएशन कॅम्प नंबर ३, मेन बाजार कॅम्प नंबर ४ येथे व्यापारी, दुकानदार यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे, नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, किरण सोनावणे, सोनी भाटिया, पी. एस.आहुजा, दीपेश हसीजा, लाल गुरनानी, लाल पिंजानी, भारत आहुजा, शशिकांत दायमा आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.

उल्हासनगरची ओळख पुसू देणार नाही
पूर्वजांनी जो व्यापार शून्यातून निर्माण केला त्यावरच डीपीमुळे संक्रांत ओढवली आहे, अशी खंत व्यापाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली. यावेळी व्यापार हीच उल्हासनगरची ओळख असून ती कदापिही पुसली जाणार नाही, अशी ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली.