निरामय जगण्यासाठी… किडनी फेल्युअर मागची कारणे

>> डॉ. ज्योत्स्ना झोपे << 

मूत्रपिंड काम करणं थांबवतेअर्थात किडनी फेल्युअर. काय असतील यामागची कारणे….

 आरोग्य तपासणी हवीच!

किडनी फेल्युअरवर उपाय म्हणजे नियमित आरोग्य तपासणी, आहार, व्यायाम… पहिल्या दिवसापासून मधुमेहाची काळजी घ्या. डॉक्टरांनी सांगितलेले रक्त व लघवी तपासणी करून घेतली पाहिजे. रक्तदाब मोजून पाहायला हवा. या रोगांची कारणं म्हणजे बाहेरचं खाणं. या बाहेरच्या खाण्यामध्ये मीठ जास्त असते. अलीकडे कामाचा ताण जास्त असतो. स्पर्धा खूप मोठी असते. त्यामुळे आजकालच्या तरुण मुलांमध्येही मधुमेह आणि रक्तदाबाचे रोग पाहायला मिळतात. रक्तदाब वाढलेला आहे हे त्यांना माहीतच नसतं. औषधं घ्यायला हवीत याचं महत्त्वच त्यांना कळत नाही. 

शरीराची रोजची घाण बाहेर काढण्याचे प्रमुख काम मूत्रपिंड अर्थात किडनी करते. घनरूप घाण शौचाद्वारे तर द्रव स्वरूपातील घाण लघवीद्वारे बाहेर टाकते. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे रक्तदाब नियंत्रित करणं, तिसरं काम हाडे मजबूत ठेवण्याचं आणि अखेरचं रक्त बनवायला मदत करणं… ज्यावेळी कुठल्याही कारणाने किडनी काम करत नाही तेव्हा ही चारही कामं कमी होतात यालाच ‘किडनी फेल्युअर’ म्हटलं जातं. किडनी फेल्युअरही वेगवेगळ्या प्रकारची असतात. एक ‘ऍक्युट किडनी फेल्युअर’. म्हणजे ज्यावेळी किडनी चांगली आहे पण अचानक किडनीला काही इजा होते. यात लगेच रुग्णालयात जाऊन त्यावर योग्य उपचार झाले तर हे फेल्युअर बरे होऊ शकते. म्हणजे ही रिव्हर्सिबल असते. पण दुसऱया प्रकारचे किडनी फेल्युअर बरे होऊ शकत नाही.  ती रिव्हर्सिबल नसते. याला ‘क्रॉनिक किडनी फेल्युअर’ म्हणतात.

क्रॉनिक किडनी फेल झाली तर मूत्रपिंडाकडून होणारी महत्त्वाची कामे कशी होणार? यासाठी कृत्रिमरीत्या उपचार वेगवेगळी औषधे, इंजेक्शन्स आहेत. त्यानंतर शेवटचा उपाय म्हणजे डायलिसिस करावे लागते किंवा डायलिसिसऐवजी दुसऱया किडनीचे प्रत्यारोपण करता येते.

काळजी कशी घ्यावी

  • मधुमेह, उच्च रक्तदाब असल्यास तो नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
  • घरात मूत्रपिंडाचा आजार असेल किंवा लहानपणी मूत्रपिंड विकार होऊन गेला असेल, मूतखडा, लघवीचा जंतूसंसर्ग असेल किंवा अंगाकर सूज येत असेल तर प्रतिवर्षी मूत्रपिंडाचे कार्य अवश्य तपासावे.
  • पौष्टिक आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे.
  • वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कारण स्थूलता असेल तरीही मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. त्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे, त्याने वजन नियंत्रणात ठेवता येईल.
  • उच्च रक्तदाब व मूत्रपिंड विकार यांचा त्रास असेल तर धूम्रपान-मद्यपानापासून दूर राहावे.
  • अनेक जण स्वतःच्या मनाने डोकेदुखी, पाठदुखी यासाठी दीर्घकाळ वेदनाशामक गोळ्या घेतात. अपचनासाठीही लोक वर्षांनुवर्षे विशिष्ट गोळ्या घेतात. त्याचा मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे औषधे घेणे टाळावे.

या रोगाची कारणे

क्रॉनिक किडनी फेल्युअरची कारणे म्हणजे मधुमेह, रक्तदाब, धूम्रपान… आजच्या धकाधकीच्या जीवनात या कारणांमुळे होणारे किडनी फेल्युअर बरे होऊ शकत नाही हे लक्षात घ्यायला हवे. मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही की किडनी फेल होते. शरीर तंदुरुस्त ठेवणं ही एक कला आहे. शरीराचा दुरुपयोग कधीच करू नये. तो कराल तर त्याचा प्रभाव पुढच्या आयुष्यात मिळतो.

लेखिका किडनी विकारतज्ञ आहेत