रिसॉर्टमधील संख्या 40 टक्क्यांनी घटली, वसईचा पर्यटन व्यवसाय थंडीने कुडकुडला

cold-wave

सामना प्रतिनिधी, वसई

गुलाबी थंडी सर्वांनाच हवीहवीशी वाटत असली तरी पारा 14-15 वर जाऊन पोहोचल्याने त्याचा फटका येथील पर्यटन व्यवसायास बसला आहे. अर्नाळा, नवापूर, राजोडी येथील रिसॉर्टमध्ये एरवी वीकेण्डला पर्यटकांची जणू जत्राच भरते. मात्र थंडीमुळे आता ही संख्या 40 टक्क्यांनी घटली असून रोजगारावरही त्याचा परिणाम झाला आहे, तर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रिसॉर्टचालकांनी आता कॅम्प फायर, वसई दर्शन असे विविध फंडे अवलंबण्यास सुरुवात केली आहे.

वसई म्हटली की इथला समुद्रकिनारा.. हिरवीगार झाडी.. हवाहवासा वाटणारा निसर्ग आणि स्थानिक संस्कृती याचे अप्रूप अनेकांना असते. सुट्टीच्या काळात तसेच शनिवारी व रविवारी ठाणे, रायगड, पालघर जिल्हा तसेच मुंबईतून हजारो जण घडीभर विश्रांती घेण्यासाठी तसेच मौजमजा करण्याकरिता कुटुंबकबिल्यासह येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून पारा घसरल्याने हुडहुडी भरली आहे. येथील दैनंदिन व्यवहार सकाळी दहाशिवाय सुरू होत नाही, तर अकरापर्यंत धुके असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. या थंडीमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.

वसईतील अर्नाळा, नवापूर, राजोडी ही पर्यटकांची आवडती ठिकाणे असून तेथे लहानमोठी एकूण 120 रिसॉर्ट्स आहेत. समुद्रकिनाऱयापासून केवळ 500 मीटर अंतरावर ही रिसॉर्ट असल्याने अनेक जण येथे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येतात. दर दिवशी प्रतिमाणशी केवळ 600 रुपये आकारून त्यात चहा, नाश्ता, जेवण, रेन डान्स तसेच स्वीमिंग पूल, खेळण्याची साधने आदी अनेक सुविधा दिल्या जातात. गेल्या आठ दिवसांपासून दात-ओठ खाणाऱया थंडीमुळे पाण्यात उतरणे तर सोडाच, पण रिसॉर्टमध्ये येण्याचेही टाळत आहेत. त्यामुळे मालकांनी आता कॅम्प फायरचे आयोजन सुरू केले असून ग्रुप असेल तर त्याच पैशात वसई दर्शनही घडवले जात आहे. रिसॉर्टमध्ये काम करत असलेल्या स्थानिकांच्या रोजगारावरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

बांडी भाजण्याचा कार्यक्रम
पर्यटकांनी थंडीतही यावे यासाठी अनेक रिसॉर्टमध्ये बांडी भाजण्याचा कार्यक्रम आखला आहे. शेतातील वाल्याच्या शेंगा, बटाटी बांडीत भरून एका विशिष्ट झाडाच्या पाल्याने बांडीचे तोंड घट्ट बांधून ठेवण्यात येते. त्यानंतर ते शेकोटीत भाजले जाते. वालाच्या शेंगा व बांडी भाजण्याच्या कॉम्बिनेशनचा अनुभव रिसॉर्टचालक पर्यटकांना देत आहेत. रायगड जिह्यात त्यास ‘पोपटी’ असे म्हणतात. थंडीमुळे व्यवसायावर 40 टक्के परिणाम झाल्याची कबुली अर्नाळा-कळंब रिसॉर्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास मेहेर यांनी दिली.