‘पतंजली’नंतर आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचे रिटेल स्टोअर्स

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

योगगुरू रामदेवबाबा यांनी पतंजलीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर द्यायला सुरुवात केलेली असतानाच आता आणखी एक आध्यात्मिक गुरू या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री  रविशंकर हे आयुर्वेदिक टुथपेस्ट आणि साबण विकण्यासाठी एक हजार रिटेल्स स्टोअर उघडणार आहेत. तसेच पतंजलीच्या धर्तीवर क्लिनिक आणि उपचार केंद्रही सुरू करणार आहेत.

श्री श्री रविशंकर यांच्या रिटेल्स स्टोअर्समध्ये टुथपेस्ट, डिटर्जंट, तूप, कुकीज विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. श्री श्री आयुर्वेद ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेज कटपीटिया यांनी श्री श्री तत्त्व या नावाने कंपनी स्टोअर्स सुरू करणार असल्याचे सांगितले. आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. आमची ब्रॅण्ड उत्पादने अन्य कंपन्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहेत, असे कटपीटिया म्हणाले. २००३ सालापासून कंपनी हेल्थ ड्रिंक्स, साबण, मसाले आदी उत्पादनांची विक्री करीत आहे. या उत्पादनांची रिटेल स्टोअर्स  आणि ऑनलाइन विक्री केली जात आहे. आता कंपनी विविध पदार्थ आणि गृहोपयोगी उत्पादनांच्या निर्मिती क्षेत्रात विस्तार करणार असून ३०० हून अधिक उत्पादने बाजारात आणणार आहे, असे कटपीटिया यांनी सांगितले.