भ्रष्टाचारप्रकरणी ओडिशा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींना अटक

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

देशातील ४६ वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशांवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती घातलेली असताना ही बंदी उठविण्यासाठी लखनौमधील महाविद्यालयाकडून लाच घेणारे ओडिशा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मसरूर कुद्देसी यांना सीबीआयने अटक केली. कुद्देसी यांच्यासोबत अन्य पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

सुविधांचा अभाव व नियमांची पूर्तता न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने देशातील ४६ वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशांवर बंदी घातली आहे. यात लखनौमधील प्रसाद एज्युकेशनल ट्रस्टचाही समावेश आहे. ही बंदी उठविण्यासाठी या महाविद्यालयाचे बी. पी. यादव  आणि पालाश यादव यांनी ओडिशा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मसरूर कुद्देसी यांच्याशी संपर्क साधला होता. कुद्देसी यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली चांगली ओळख आहे असे सांगून हे प्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडून एक कोटीची लाच घेतली होती. बुधवारी रात्री सीबीआयने नवी दिल्ली, भुवनेश्वर, लखनौ येथील आठ ठिकाणी छापे मारून मसरूर कुद्देसी, बी. पी. यादव, पालश यादव, बिस्वनाथ अग्रवाल, रामदेव सारस्वत या पाच जणांना अटक केली आहे.