चार लाख पदरमोड करुन 100 चित्रांतून साकारले शिवचरित्र, शिक्षकाची अनोखी शिवभक्ती

10

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

पंढरपूर येथील सेवा निवृत्त कलाशिक्षक सुभाष पाटसकर यांनी मागील 10 वर्षांपासून परिश्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर भव्य आकराची चित्र रेखाटली आहेत. या चित्रबद्ध शिवचरित्राचे प्रदर्शन लवकरच ते पंढरपुरात भरवणार असल्याची माहिती पाटसकर सर यांनी दिली. पंढरपूर येथील सखूबाई कन्या प्रशालेतील कला शिक्षक सुभाष पाटसकर यांचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वार्तालाप घेण्यात आला त्यामध्ये ही माहिती देण्यात आली. यावेळी सेवा निवृत्त मुख्याध्यापक जिवन पाटील उपस्थित होते.

teacher

पाटसकर यांनी सांगितले की, लहाणपणापासूनच शिवचरित्राची आवड होती. 2005 साली सेवा निवृत्त झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र चित्रबद्ध करण्याचा निश्चय केला आणि विविध संशोधकांची शिवचरित्रे वाचन केले. चित्र कलेच्या विविध शैलींचाही अभ्यास केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकानंतरच्या काही काल खंडातील प्रसंगासह 100 चित्र काढण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपल्या सेवा निवृत्ती वेतनातून या चित्रांसाठी सुमारे 4 लाख रूपयांचा खर्च त्यांनी केला आहे. मागील 10 वर्षात त्यांनी विविध चित्र शैलींचा अभ्यास करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या 100 प्रसंगांचा विविध संशोधकांनी मांडलेल्या शिवचरित्राचाही अभ्यास केला आणि वेगळ्या स्वतंत्र शैलीमध्ये शिव चरित्र रेखाटण्याचे काम हाती घेतले.

chatrapati1

मागील 10 वर्षांपासून त्यांच्या या परिश्रमाला आता मुर्त स्वरूप आले असून 100 चित्रे काढून तयार झालेली आहेत. यापैकी राज्यभिषेक सोहळ्यासह काही महत्वाच्या प्रसंगातील चित्रे 10 बाय 10 चौरस फूट एवढ्या मोठ्या आकारात रेखाटली आहे. त्याचबरोबर सर्वच चित्र साधारणपणे 3 बाय 4 ते 4 बाय 4 या आकारात रेखाटली आहेत. सर्व साधारण चित्र शैली न वापरता अनेक चित्र शैलींचा अभ्यास करून एक सामायिक नवीनच चित्र शैली निर्माण करून ही चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. त्यामुळे अन्य सर्व सामान्य चित्रांपेक्षा ही चित्रे वेगळ्या स्वरूपाची ठरलेली आहेत. एकेका चित्राच्या सुरक्षिततेसाठी पुणे, सोलापूर येथून फ्रेम्स मागवल्या आहेत, विशेष प्रकारच्या प्लॅस्टिक कागदाचे आवरण वापरण्यात आले आहे. चित्रासाठी विशेष प्रकारचे रंग वापरल्यामुळे चित्रे वेगळी आणि आकर्षक झाल्याचेही पाटसकर यांनी यावेळी सांगितले.

35 चित्रांना 40 लाखांची मागणी
या चित्रांची माहिती मिळाल्यानंतर पूणे येथील एका व्यक्तीने येथे येऊन चित्रे पाहिली. तोपर्यंत केवळ 35 चित्रे काढून झालेली होती. आणि त्या सर्व 35 चित्रांसाठी 40 लाख रूपये देण्याची तयारी त्याने दर्शवली होती. मात्र आपण त्यास नकार देत संपूर्ण 100 चित्रे काढून चित्रबद्ध शिवचरित्राची संकल्पना पुर्णत्वास नेणार असल्याचे पाटसकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या