इगतपुरीत २ कंपनी व ३ गाळे सील, नगरपालिकेने केली सव्वा लाखांची वसुली

 सामना ऑनलाईन, इगतपुरी

मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी नगर परिषद कर विभागाच्या वतीने मुख्यधिकारी विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी शहरात धडक वसुली मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २ कंपनी व ३ जणांच्या गाळ्यांवर कारवाई करत सील करण्यात आल्याची माहिती कर निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली आहे.

इगतपुरी शहरातील तळेगाव औद्योगिक वसाहतीतील सार कनेक्ट, शम्स प्लास्टिक इंडस्ट्रीज तर मानस लाईफस्टाईल परिसरातील कमलाकर पवार, भाजी मंडईतील ३ व्यापारी असे एकूण ५ थकीत मिळकत कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  होळीचा उत्सव व रविवारची सुटी असूनदेखील नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी १२ ते ४ वाजेच्या सुमारास भर उन्हात कारवाई केली. सार्क कनेक्ट, शम्स प्लास्टिक इंडस्ट्रीज या दोन्ही कंपनीचा वीजपुरवठा खंडित करून कार्यालय सील करण्यात आले, तर तिघांच्या गाळ्यांना सील करण्यात आले.

दरम्यान या अचानक झालेल्या कारवाईमुळे थकीत मिळकत धारक गोंधळून गेले होते. परिणामी शम्स प्लास्टिक इंडस्ट्रीज या कंपनीकडे थकीत असलेल्या ३लाख ६५ हजार रकमेपैकी १ लाख रुपयांचा धनादेश नगरपालिकेला दिला. तर भाजी मंडईतील एका भाजी व्यावसायिकाने १३९०० भरल्याने त्यांचे सील काढण्यात आले. या मोहिमेत मुख्यधिकारी डॉ. विजय कुमार मुंढे, कर निरीक्षक अनिल पाटील, कर्मचारी एजाज शेख, अजय वर्दे, रफीक शेख, बाळू दालभगत, कृष्णा गायकवाड, संतोष गायकवाड, विकी जिनिवाल, गणपत अवघडे सहभागी झाले होते.

गेल्या एक महिन्यापासून नगरपरिषदेचे कर्मचारी घरपट्टी, पाणीपट्टी वसुली करण्यासाठी घरोघरी फिरत असूनदेखील काही थकबाकीदार घरपट्टी, पाणीपट्टी भरत नसल्याने त्यांनी दि. १५ मार्चपर्यंत आपली थकबाकी भरावी म्हणून असे फलक शहरात ठिकठिकाणी लावले असून ज्यांनी थकबाकी भरली अशा थकबाकीदारांची नावे या फलकावर प्रसिध्द करणार आहे.

डॉ. विजयकुमार मुंढे, मुख्याधिकारी इगतपुरी