हवीहवीशी मिडलक्लास कॉमेडी

257

>> क्षितिज झारापकर

दहा बाय दहा. कोणत्याही कलेतील तरुण पिढी त्या कलेला सक्षम बनवत असते. हे नाटक पाहून आपली मराठी रंगभूमी तरुण पिढीच्या हाती अजूनच सक्षम आणि परिपक्व होते आहे याची खात्री पटते.

कोणत्याही क्षेत्रात नवीन पिढी येते तेव्हा त्या क्षेत्रात अपेक्षा खूप वाढतात. तसंच काहीसं मराठी रंगभूमीचं सध्या चाललंय. नव्या दमाचे रंगकर्मी मराठी रंगभूमी जोमाने समृध्द करण्यात गुंग झाले आहेत. अनन्या, देवबाभळीसारखी नाटकं रंगभूमीवर येत आहेत. हे चित्र खूप आश्वासक आहे. मराठी रंगभूमी खंबीर हातात पडतेय हे पाहून आनंद होतो. त्यात पुन्हा ही नवीन पिढी खूप वेगळं काहीतरी घेऊन उभी ठाकली आहे असं नाही. त्यांची अभिव्यक्ती जरूर वेगळी आहे पण त्यांचं मराठी नाटक हे पारंपरिक प्रेक्षकांना रुचेल भावेल असंच आहे. विषय आजचे आहेत आणि ते रसीकांना पटणारे आहेत. अशा ह्या नव्या पिढीच्या नाट्यकर्मीचं एक नवीन नाटक नुकतचं रंगभूमीवर रुजू झालंय. हे नाटक तुफान गर्दी खेचत सुरु झालेलं आहे. व्यावसायिक गणितांमध्ये नाटक यशस्वी होण्याचं गमक त्याच्या गल्ल्यावर आहे. ह्या नाटकाने ह्या बाबतीतही यशस्वी असल्याचे ठामपणे दाखवून दिलेले आहे. ह्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत अनिकेत पाटील आणि लेखक आहेत संजय जमखंडी व वैभव सानप. हे नाटक आहे स्वरुप क्रिएशन ऍण्ड मीडिया निर्मित आणि अष्टविनायक प्रकशित ‘दहा बाय दहा’.

‘दहा बाय दहा’ ही एक कॉमेडी आहे. ह्या नाटकाच्या लिखाणाची पठडी ही आता क्लासिक लक्ष्मीकांत बेर्डे टाईप नाटकांची पठडी आहे. अशा पध्दतीचं नाटक लिहिताना लेखक प्रासंगिक विनोदांमध्ये अडकले नाटकाचा मुळ विषय बाजूला पडण्याचा धोका संभवतो. ‘दहा बाय दहा’मध्ये मात्र असं घडत नाही. संजय जमखंडी आणि वैभव सानप विषयाचं भान ठेवून विनोदाकडे वळतात अणि सतत प्रेक्षकांच्या ध्यानात विषय राहील याची खबरदारी घेतात. लेखकांनी रंगवलेले प्रसंग खूपचं रंजक आहेत आणि् त्यामूळे नटांना खुलायलाही अधिक वाव मिळालेला आहे. ‘दहा बाय दहा’ ह्या नाटकाची लिखाणातली सर्वात जमेची बाजू म्हणजे ह्यातील प्रत्येक पात्राला कथानकात योग्य न्याय दिला गेला आहे. नाटकातलं पात्र किती मोठं आहे ह्या पेक्षा ते पात्र नाटकात नेमकं काय करतं हे महत्वाचं असतं. ‘दहा बाय दहा’मधलं प्रत्येक पात्र नाटक पुढे नेण्यात सक्रिय भाग घेतं हे विशेष आहे. एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय पण त्यातही लोअर इन्कम ग्रुप मधल्या मराठी कुटुंबाची ही गोष्ट आहे. न जमणाऱ्या आर्थिक समिकरणाशी झुंझण्यात कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या आकांशांना मर्यादा आहेत आणि अशातच असं काहीतरी घडतं की ह्या कुटुंबाला खूप काही शिकवून जातं आणि स्वंयसिद्धही करून जातं. ही ‘दहा बाय दहा’ह्या नाटकाची रुपरेषा आहे. ही साधी गोष्ट अत्यंत कल्पकतेने संजय जमखंडी आणि वैभव सानप यांनी मांडली आहे. नाटक शेवटपर्यंत मनोरंजन करीत पुढे सरकत राहतं.

अनिकेत पाटील हा एक होतकरु दिग्दर्शक आहे हे त्याने त्याच्या ह्या आधीच्या ‘ओवी’ ह्या नाटकातून दाखवून दिलं आहे. ‘दहा बाय दहा’मध्ये अनिकेतने पुन्हा ह्याची प्रचिती दिलेली आहे. ‘ओवी’ मध्ये त्याने खूप गिमिक्स वापरुन रहस्यमयता आणि भय अधोरेखीत केलं होतं. इथे त्याला तसं काही करायला अजिबात वाव नाहीये. तरीही अनिकेत ‘दहा बाय दहा’ खूप रंजक करण्यात यशस्वी झालेला आहे. ‘दहा बाय दहा’मध्ये अनिकेतने पात्रांची जातकुळी खूबीने वापरलेली आहे. त्यामुळे पात्र खरी म्हणून उभी राहतात. तद्दन विनोदी नाटकात हे साध्य करणं लक्षणीय आहे. रिक्षावाला बाप, साधीभोळी आई, हुशार मुलगी आणि स्ट्रीटस्मार्ट मुलगा हे कुटुंब अनिकेतने योग्य स्ट्रेस देऊन उभं केलंय. त्याच बरोबर बाकीच्या पात्रांमधलं डिटेलिंग उत्कृष्टपणे अनिकेतने उभं केलयं.

‘दहा बाय दहा’मधील सर्वात जमेची बाजू आहे नाटकाचे कलाकार. परिस्थितीशी झुंझणारा बाप ज्येष्ठ विनोदवीर विजय पाटकर यांनी उत्तम साकारला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर विजय पाटकर रंगभूमीवर पुन्हा आलेले आहेत. रबरस्टार अशी ख्याती मिळवलेले विजय पाटकर ‘दहा बाय दहा’मधे त्यांचा अभिनय किती लवचिक आहे हे दाखवून देतात. मुलाच्या भूमिकेत प्रथमेश परब धम्माल करुन जातो. प्रथमेशने ‘दहा बाय दहा’मध्ये योग्य असा संयत अभिनय करुन एका समंजस कलाकाराची ओळख मिळवली आहे हे कौतुकास्पद आहे. विदिशा म्हस्कर हिने अत्यंत चुणचुणीत अभिनय करुन मुलीचं पात्र जिवंत केलंय. गौरव मालणकर आणि अमीर तडवळकर यांनीही आपापली कामगिरी चोख बजवली आहे. ‘दहा बाय दहा’च्या टीमची कायरोन पोलार्ड आहे ती सुप्रिया पाठारे. भोळीभाबडी आई म्हणून सुप्रिया ‘दहा बाय दहा’ मध्ये अक्षरशः धिंगाणा घालते.  आलेला प्रसंग निभावुन जाऊन ह्या कुटुंबाला नवी उमेद मिळते ती ही तिच्याचं पात्रामूळे. म्हणजे एका अर्थाने सुप्रियाची भूमिका ही ज्याला आपण ऑथर बॅक्ड म्हणतो तशी आहे.

संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य खूपचं छान जमलेलं आहे. आशुतोष वाघमारे यांचं संगीतही योग्य आहे. विजय गोळे, दिनेश पवार, रश्मी सावंत ही तांत्रिक टीमही आपलं काम नेमकेपणाने करुन जातात. निर्माते सचिन नारकर, विकास पवार आणि आकाश पेंढारकर यांचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. ‘दहा बाय दहा’हा निखळ मनेरंजनाचा खजिना आहे.

 • नाटक     दहा बाय दहा
 • निर्मिती   स्वरूप रिक्रिएशन ऍण्ड मीडिया,अष्टविनायक
 • निर्माते    सचिन नारकर, विकास पवार, आकाश पेंढारकर
 • लेखक     संजय जमखंडी, वैभव सानप
 • संगीत     आशुतोष वाघमारे
 • प्रकाशयोजना       विजय गोळे
 • नेपथ्य     संदेश बेंदे
 • रंगभूषा   हितेश पवार
 • वेशभूषा रश्मी सावंत
 • दिग्दर्शक अनिकेत पाटील
 • कलाकार सुप्रिया पाठारे, बिदिशा म्हसकर, प्रथमेश परब, गौरव मालणकर, अमीर तडवळकर, विजय पाटकर
 • दर्जा  ***
आपली प्रतिक्रिया द्या