उमेश-तेजश्रीने गिरवले कार्यशाळेतून धडे

सामना ऑनलाईन । मुंबई

सिनेमातील कलाकार कितीही मोठे असले तरी त्यांना नेहमीच काही ना काहीतरी नवीन शिकण्याची किंवा आपल्या कौशल्यात आणखीन भर करण्यासाठी इच्छा असते. आपल्या अभिनय कौशल्यात ज्ञानाची अधिक भर घालण्यासाठी काही अभिनेते वर्कशॉपचा आधार घेतात. उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या जोडीनेही अलीकडेच काही खास वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला. झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘असेही एकदा व्हावे’ चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. त्यातील दोघांची भूमिका आव्हानात्मक आहे. या भूमिकेसाठी दोघांनी विशेष वर्कशॉप केले आहेत.

‘असेही एकदा व्हावे’ मधील ‘यु नो व्हॉट ?’ ह्या कवितेला खूप चांगला मिळत आहे. यात उमेशने पहिल्यांदा गिटार वाजवली आहे. त्याने गिटारचे प्रशिक्षण हे अद्वैत पटवर्धन यांच्याकडून घेतले. ऑनस्क्रीन उमेशला गिटार सुलभ हाताळता यावी यासाठी अद्वैतनेदेखील चोख मार्गदर्शन केले.

तेजश्री प्रधान या सिनेमात रेडियो जॉकीची भूमिका करत आहे. यासाठी तिने खूप मेहनत घेतलेय. तिने आर.जे. चे खास महिनाभर प्रशिक्षण घेतले. रेडियो जॉकींचे बोलणे, श्रोत्यांसोबतचा संवाद, शब्दोच्चार, हजरजबाबीपणा आणि मनोरंजन या सर्व गोष्टी तेजश्रीने जवळून न्याहाळल्या. तेजश्रीने एका रेडीओ स्टेशनला भेटदेखील दिली. आर. जे. किरणच्या व्यक्तीरेखेत चोख बसण्यासाठी तिने आर. जे.च्या कामाचे निरीक्षण करत त्यांच्याशी संवाद साधून काही टिप्स घेतल्या. उमेश-तेजश्रीने यापूर्वी ‘असेही एकदा व्हावे’ या चित्रपटातून एकमेकांसोबत काम जरी केले असले तरी, त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री दाखवणारा ‘असेही एकदा व्हावे’ हा पहिलाच सिनेमा आहे. या चित्रपटाची निर्मिती मधुकर रहाणे यांनी केली आहे आणि त्यांना रवींद्र शिंगणे यांनीह साथ दिली आहे.