भाई- व्यक्ती की वल्ली: सबकुछ ‘पुल’

8

रश्मी पाटकर, मुंबई

‘पु. ल. देशपांडे’ या नावाविषयी माहीत नाही, असा महाराष्ट्रातला रसिक वाचक शोधूनही सापडणार नाही, इतकं हे नाव परिचयाचं आहे. त्यांची पुस्तक, नाटकं, प्रवासवर्णनं यांनी अवघ्या महाराष्ट्राला खदखदून हसवलं. पण, पुलं तेवढेच नव्हते. जगण्याकडे, त्यातल्या विसंगतीकडे पाहण्याची त्यांना एक विलक्षण दृष्टी लाभली होती. त्यातून त्यांनी नेहमी आनंद शोधला. थोडक्यात पुलं हे नाटककार, संगीतकार, अभिनेते आणि किंबहुना परफॉर्मर हा शब्द अचूक लागू पडावा असे अवलिया होते. खरंतर त्यांच्याविषयी नव्याने सांगावं, काहीतरी नवीन कळावं असं काहीही नाही. पण, जो लेखक आजच्या तरुण पिढीलाही स्वतःच्या विनोदाच्या प्रेमात पाडतो, त्या लेखकाच्या हयातीत घडलेल्या घटना कशा असतील, याची उत्सुकता पुलंच्या वाचकांना नक्कीच असणार. ‘भाई- व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट त्याचा पुनर्प्रत्यय देतो हे निश्चित.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच दिग्दर्शक हे स्पष्ट करून देतात की, पुलंचा जीवनपट साकारण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यात व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचाही आधार घेण्यात आला आहे. वास्तवाशी कल्पनेची सांगड घालत हा चित्रपट घडतो. अर्थात हा चित्रपट म्हणजे पूर्वार्ध आहे. त्याचा उत्तरार्ध येणं अजून बाकी आहे. पण, पुलंचं बालपण ते तरुणपण दाखवणारा हा पूर्वार्ध अत्यंत लोभसवाणा झाला आहे. लहानगा, खट्याळ, कोट्या करणारा पुरुषोत्तम ते बॅरिस्टर असूनही नाटक-सिनेमात नाव कमावणारा आणि आनंद लुटणारा भाई असा प्रवास प्रेक्षकांना गुंगवून टाकतो. वडील आणि नवविवाहित पत्नी यांच्या मृत्यूने व्यथित झालेले पुलं फक्त आनंद वाटण्याचं निश्चित करतात आणि पुढे आयुष्यभर आनंदयात्री म्हणून जगतात, हे पाहण्यासारखं आहे. या पूर्वार्धामध्ये आयुष्याने रंगवलेल्या ऊन आणि सावल्यांच्या खेळात पुलंच्या विनोदी, मिश्कील स्वभावाची सावली सतत पडदा व्यापून उरते. त्यामुळे इथे कथा सांगितली तर त्यातली गंमत निघून जाईल. ती थेट चित्रपटातच पाहावी लागेल.

पाहा या चित्रपटाचा ट्रेलर-

चित्रपटातल्या कलाकारांबाबत बोलायचं झालं तर सागर देशमुख या अभिनेत्याला पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतात. कारण, याआधी काही ठरावीक अभिनेत्यांनी साकारलेले पुलं आणि ‘ऍड फेस’ अशी ओळख असलेला सागर यांची सांगड घालताना पुलं नावाचं शिवधनुष्य त्याला पेलवेल का? हा प्रश्न उपस्थित झाला होता. पण, त्याचं उत्तर खचितच ‘हो’ आहे. पुलंच्या चेहऱ्यावरची मिश्कील झलक सागरच्या चेहऱ्यावर फारशी दिसत नाही, तरीही सागरने पुलंना अगदी तंतोतंत साकारलं आहे, असं म्हणता येईल. कारण देहबोली आणि पुलंच्या विशिष्ट शैलीतली संवादफेक. त्या आधारावर सागरने कमाल केली आहे. सागरला पुलंच्या रुपात पाहताना तरुणपणीचे पुलं डोळ्यांसमोर उभे राहतात. त्यामुळे इतर अनेक तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करता येतं. सागरला इतर कलाकारांनीही चांगली साथ दिली आहे. पुलंचे समकालीन असलेले अनेक नामवंत चेहरे साकारण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. काही ठिकाणी ही भट्टी उत्तम जमली आहे तर काही ठिकाणी प्रयत्न साफ फसल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात येतं. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉ. जब्बार पटेल, कुमार गंधर्व, ग. दि. माडगुळकर, वसंतराव देशपांडे, पंडीत भीमसेन जोशी, राम गबाले, हिराबाई बडोदेकर अशी दिग्गजांची मांदियाळी या चित्रपटातून आपल्या भेटीला येते. अर्थात अजूनही अनेक प्रसिद्ध चेहरे चित्रपटाच्या उत्तरार्धात उलगडणार आहेत. इरावती हर्षे यांनी पुलंच्या पत्नी सुनीताबाई यांची भूमिका सुंदर वठवली आहे.

चित्रपटाची तांत्रिक बाजू तोकडी पडलेली वाटते. कारण, पटकथा थोडीशी विस्कळीत झाली आहे. पुलंच्या आयुष्याचा ग्राफ मांडण्यासाठी किमान 50 चित्रपट तरी काढावे लागतील. पण, इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांचे तुकडे दोन भागांमध्ये मांडण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटात अनेकवेळा प्रसंग समजून घेण्यासाठी वेळ जातो. काही प्रसंग उत्तम जमले आहेत. पुलंच्या आणि सुनीताबाईंच्या पहिल्या भेटीचा प्रसंग गमतीदार आणि तितकाच लोभसवाणा झाला आहे. पुलंच्या समकालीन व्यक्तिमत्त्वांची ओळख प्रेक्षकांना होण्यासाठी नाटकाच्या ढंगात संवाद पेरण्यात आले आहेत. व्यक्ती आणि वल्लीतील काही पात्रं समोर का म्हणून येतात किंवा आणली जातात त्याचं कोडं उलगडत नाही. त्यामुळे ती एक गोष्ट चांगलीच खटकते. तीच बाब कला दिग्दर्शनाची. कारण, काळानुरुप बदल दाखवताना राहिलेल्या असंख्य त्रुटी प्रेक्षकाच्या सहज लक्षात येतात. अर्थात सागरने साकारलेले पुलं पाहताना या चुकांकडे कानाडोळा होतो.

या चित्रपटात एक गोष्ट मात्र आवर्जून पाहण्यासारखी किंबहुना ऐकण्यासारखी आहे. अनेक प्रसिद्ध कवी, त्यांच्या गाण्यांना पुलंनी लावलेली चाल, संगीत प्रेमी त्रिकुट असलेल्या पंडीत भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांच्या मैफिलीला पुलंनी हार्मोनियमची साथ देणं हे प्रसंग पाहताना इतिहासाचे साक्षीदार झाल्याचं समाधान प्रेक्षकांना लाभतं. राहुल देशपांडे, भुवनेश कोमकली, जयतीर्थ मेवुंडी, महेश काळे अशा आजच्या पिढीच्या शास्त्रीय गायकांचे स्वर्गीय स्वर कानातून हृदयात उमटत जातात. ही चित्रपटाची एक जमेची बाजू म्हणता येईल.

थोडक्यात काय, संगीताच्या भाषेत सांगायचं तर पुलं म्हणजे ‘स्वयंभू गंधार’ होते. सात स्वरांच्या सुरावटीतला गंधार स्वतःच निर्माण होतो, असं म्हटलं जातं. तो नेमका कसा निर्माण होतो, ते नाही सांगता येत. पण, एखाद्या गायकाला तान लावताना स्वयंभू गंधार सापडणं हे संगीतातलं स्वर्गसुख मानलं जातं. पुलंच्या आयुष्याचंही काहीसं तसंच आहे. दुःखाचे कढ सोसूनही त्यात कायम आणि फक्त आनंद शोधत राहिले. तो अविरत वाटत राहिले. पुस्तक, नाटकं, प्रवासवर्णन, नाटुकल्या, संगीत, अभिनय.. या सगळ्या सगळ्या माध्यमांतून ते सर्वांना देत राहिले. त्यांना तो आनंद कुठून गवसला, कसा गवसला हे एक अनाकलनीय कोडं आहे. पण, या आनंदयात्रीसोबत प्रवास करताना तो आपल्याला लाभत आला आहे आणि पुढच्या पिढ्यांनाही तो लाभत राहील. त्यामुळे या अवलियाची आनंदयात्रा अनुभवायची असेल, तर ‘भाई- व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट पाहावा लागेल.