हाऊसफुल्ल :  सलमानीय अर्क उणे तर्क

136

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

एक हिरो काहीही म्हणजे काहीही करू शकतो आणि जर तो सलमान असेल तर विचारच करायचा नाही. फक्त सिनेमा पाहायचा, त्यातला मसाला ओरपायचा आणि मुकाट घरी जायचं. सिनेमॅटिक गोष्टी, ‘तर्कशास्त्र वगैरे सब झूठ है’ असं स्वतःला समजावलं की, झालं, सिनेमा आवडून जाणारच.

‘भारत’ हा सिनेमा सलमान खानच्या तमाम सिनेमांपैकी एक. मसाल्यांनी ठासून भरलेला. त्यात सुंदर हिरोईन आहे, शक्तिमान तरीही निरागस हिरो आहे, नेत्रदीपक लोकेशन्स आहेत, भारावून सोडतील अशी हाणामारीची दृश्यं आहेत, खदखदून हसायला लावतील असे विनोदी प्रसंग आहेत, आठवणीत राहतील असे डायलॉग आहेत, भव्यदिव्य नाचगाणी आहेत, भरीस भर म्हणून हमखास ऊर भरून येणारी देशभक्तीची दृश्यंही आहेत. अजून काय हवं!

सलमान खानचे सिनेमे खडकाच्या चौकटीत कधीच बसत नाहीत हे सत्य स्वीकारलं तर ‘भारत’ हा सिनेमा नक्कीच करमणूक करतो. ही गोष्ट फाळणीपूर्वी पाकिस्तानात राहणार्‍या एका कुटुंबाची आहे. फाळणीच्या वेळी शेवटची ट्रेन पकडताना त्या कुटुंबाची ताटातूट होते आणि अवघ्या आठ वर्षांच्या मुलावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येते. ताटातूट होत असताना वडिलांनी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवायचं वचन तो मुलगा आयुष्यभर लक्षात ठेवतो आणि त्यासाठी काय काय करतो याची ही गोष्ट.

मधल्या काळात ‘ट्युबलाइट’सारख्या सिनेमाने सलमानच्या रसिकांची अगदीच निराशा केली होती, पण ‘भारत’मधून बाजू पुन्हा एकदा सावरली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. सिनेमाकडून फार अपेक्षा ठेवू नयेत हे सत्य असलं तरीही दोन घटकांची करमणूक नक्कीच वसूल करता येऊ शकते.

अभिनयाच्या बाबतीत म्हणायचं तर सलमान खान अभिनय कधीच करत नाही, पण तो सहज आहे, त्याला स्टाईल आहे आणि तो जे काही करतो ते वसूल असतं. अभिनयाच्या मापदंडात ते बसत नसलं तरीही प्रेक्षकाला तेच पाहायचं असतं आणि या सिनेमातही सलमान खानने आपली नेहमीची स्टाईल पुन्हा एकदा दमदारपणे साकारली आहे. विशेष म्हणजे वयाचे वेगवेगळे टप्पे बेमालूमपणे साकारताना ‘हिरोचं वय’ या विषयावरच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

कतरिना कैफ या सिनेमात खूपच सुंदर दिसते. गेल्या काही सिनेमांमध्ये कतरिनाचा जमाना संपला असं वाटत असतानाच तिचं हे नव रूप चाहत्यांना नक्कीच आवडेल यात शंका नाही. तिच्या व्यक्तिरेखेची लांबी सिनेमाभर आहे आणि तिने ती निभावलीदेखील आहे. सुनील ग्रोवर यांनीदेखील सिनेमाभर उत्तम साथ दिली आहे. उल्लेख करायला हवा तो बाल कलाकारांचा. सलमान खानची अर्थात छोट्या भारतची भूमिका साकारणार्‍या कबीर साजीदचा अभिनय खरोखरच छान झाला आहे. अगदी छोट्याशा भूमिकेत असणार्‍या सुधीर रोगाची लहानपणीची भूमिका साकारणार्‍या मुलाची अदाकारीही आवर्जून लक्षात राहते.

तेल खाडीत अडकलेला प्रसंग असो, समुद्री चाच्यांचा प्रसंग असो, हिंदुस्थान-पाकिस्तान बॉर्डरवर 50 वर्षांनंतरच्या पुनर्मिलापाचा प्रसंग असो, कशातही तर्कशास्त्र नावालादेखील नाही, पण करमणूक मात्र आहे. नुसतं जाऊन खदाखदा हसायचं असेल किंवा शिवाय इमोशनल व्हायचं असेल तर हे प्रसंग करमणूक करतील.

संगीत ठीक आहे, पण त्यात विशेष दम नाही. ‘ये शेर हुआ है, लेकिन शिकार करना नही भुला…’ सारखे पाच-पंचवीस टाळ्या वसूल संवाद जमले आहेत. छायांकन चांगलं झालं आहे. प्रेक्षकांची नस ओळखून केलेलं दिग्दर्शनही बरं आहे. गरज होती ती संकलनाच्या कात्रीची. टाइमपास थोडाच वेळ बरा वाटतो. अति खेचला की, त्याचं रूपांतर डोकेदुखीमध्ये होतं. या सिनेमाचं तसंच झालेलं आहे. मध्यांतराच्या आधी तसंच मध्यांतरानंतरही संकलनाची कात्री इमोशनल न होता फिरवली गेली हवी होती. शेवटाकडे तर ती अत्यावश्यक होती, पण आपल्या स्क्रिप्टच्या प्रेमात ती तशीच ठेवली गेली आणि त्यामुळे सिनेमा रटाळपणाकडे झुकायला लागला. एकूणच ‘भारत’ हा सिनेमा दोन घटकांच्या करमणुकीकरिता बरा पर्याय आहे. जर सलमान रसिकांना पुन्हा एकदा सलमानी स्टाईल अनुभवायची असेल तर ‘भारत’ जरूर बघावा, पण फार अपेक्षा ठेवू नयेत.

 

दर्जा         **1/2

चित्रपट      भारत

निर्माता     अतुल अग्निहोत्री, अलविरा खान अग्निहोत्री,            भूषण कुमार, किशन कुमार

दिग्दर्शक    अली अब्बास जाफर

संगीत       विशाल शेखर

कलाकार   सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पाटनी, सुनील ग्रोवर, सोनाली कुलकर्णी, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, तब्बू

आपली प्रतिक्रिया द्या