वेधक सृष्टीदर्शन

>> अरूण मालेगावकर

माणूस देशात असो, परदेशात असो, तो रसिक आणि निसर्गप्रेमी असेल तर सृष्टीदर्शनाचे सुख मनापासून अनुभवतो. अरविंद जोशी हे असेच एक कविमनाचे रसिक आहेत. सहा ऋतूंचे सहा सोहळे आपल्या समर्थ शैलीत वेधकपणे मांडतात. त्या मांडणीत प्रसन्नतेच्या ओलाव्याने अवघे लेखन बहारदार करून टाकतात. ‘0 ते औ 6 आणि 0 ते – 6’ हे पुस्तक असेच बहारदार आहे. अमेरिकेतील ऋतुचक्राचा परिचय करून देताना हिंदुस्थानातील वेगळेपणाही लेखकाने टिपला. एक तर मराठी मुलखात बर्फवर्षा होत नाही. या दगडांच्या देशात त्यामुळे सुमारे आठ महिने थंडावा नसतो. इथला शिशिर भलताच उदासवाणा असतो तर अवकाळी पावसामुळे ‘दरसाल दुष्काळ’ आपण नेहमीच अनुभवतो. अमेरिकेत थंड वातावरण सहा महिन्यांपेक्षा अधिक असल्याने प्रचंड उत्साह व दीर्घायुष्याचे प्रमाण अधिक आहे.

हिमवर्षावाने सर्वत्र पसरलेल्या बर्फाचा जाडसर थर बघताना मराठी माणूस- उष्ण कटिबंधातील माणूस नवलाने पाहातच राहतो. याबाबतीत लेखकाने केलेली वर्णने वाचनीय आहेत. समजा इथे बर्फ पडला असता तर तो हटवण्याचेही कंत्राट दिले असते. अर्थात ‘मलिदा’ नावाच्या पदार्थाची एक आणखी सोय झाली असती, असेही कदाचित घडले असते. अशा आणि इतर अनेक गोष्टींची उपयुक्त माहिती या पुस्तकात आहे. विदेशात जाऊ इच्छिणाऱयांसाठी हे पुस्तक एक उत्तम ‘वाटाडय़ा’सारखे आहे.

0 ते औ6 आणि 0 ते -6/ प्रवास

लेखक – अरविंद जोशी

प्रकाशक – व्यास क्रिएशन्स, ठाणे-२

पृष्ठ– १०४

मूल्य  – १२० रुपये