वैचारिक जडणघडण


>> अरविंद दोडे

आपल्या देशातील अनेक गोष्टींबाबत विदेशी अभ्यासक आणि विचारवंतांना अतिशय कुतूहल आहे. येथील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय वातावरण इतक्या वेगाने तांत्रिकदृष्टय़ा सतत बदलताना दिसत आहे की, विचारवंतांना ठामपणे आपले आलेखीय निष्कर्ष काढणे केवळ अशक्य झाले आहे. इतिहास हाही असाच चमत्कारपूर्ण आहे. या साऱया गोष्टींचा विचार करून रामचंद्र गुहा यांनी संपादित केलेल्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकाचा शारदा साठे यांनी अनुवाद केला आहे, तो ‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’ या नावाने.

एकूण पाच विभागांत हे संपादन विभागले असून लो. टिळकांपासून हमीद दलवाई यांच्यापर्यंत आपल्या विचारवंतांचे विशेष विचार यात वाचायला मिळतात. भारतीय विचारप्रवाहांच्या महानदीला अनेक देशभक्तांच्या विचारांच्या उपनद्या येऊन मिळाल्या आहेत. राजा राममोहन रॉय या पहिल्या उदारमतवादी समाजसेवकांचे कार्य, जीवन आणि त्यांचे विचार आजही नवीन वाटतात. स्त्र्ााrपुरुषांमधील परस्पर संबंध कसे होते, कसे असावेत यावरील त्यांचे विकसनशील विचार आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याबरोबरच शिक्षणाची गरज त्यांनी पटवून दिली आहे. देशीय मनोभूमिका जशी वेगळी दिसते तशीच सुधारक आणि क्रांतिकारकांची समांतर कामगिरी समजून घेताना सय्यद खान, म. फुले, गो.कृ. गोखले, लो. टिळक आणि ताराबाई शिंदे यांचे प्रक्षोभक विचार हे आपल्या ‘भारतीयत्वा’वर फार परखड मते नोंदवितात.

राष्ट्राची उपासना आणि जोपासना करताना म. गांधी, गुरुदेव टागोर, डॉ. आंबेडकर, महमद जीना आदींनी तत्कालीन विचारांना नवी दिशा दिली, ती या तिसऱया विभागात वाचायला मिळते आणि आपली वैचारिक उंची वाढवते. याशिवाय लोकशाहीवरील चर्चांमध्ये ज. नेहरू, गोळवलकर गुरुजी, लोहिया, जयप्रकाश नारायण यांचे विचार घेतले आहेत. हिंदू राष्ट्राचा वाद आणि मुसलमानांपासून संभाव्य धोका याचा ऊहापोह महत्त्वपूर्ण आहे. ‘जात आणि वर्गावर प्रहार करताना समाजवादाची देशीयता आणि राजकीय विकेंद्रीकरण याबाबत केलेले आवाहन किती नि कसे समर्थनीय आहे याचा अंदाज येतो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी अपेक्षित असलेल्या हिंदुस्थानचे भवितव्य रंगविले आहे.

शेवटचे आधुनिकतावादी म्हणून दलवाईंचा उल्लेख केला जातो. धर्मनिरपेक्षतेपुढील आव्हाने झेलताना उदारमतवादामुळे विचारवंतांमध्ये एकता, बंधुता आणि समता किती आवश्यक आहे हे त्यांनी थोडक्यात पटवून दिले आहे. जगात आपले स्थान काही विशेष आहे की नाही या प्रश्नाचे विस्तृत उत्तर समजून घेणे फार गरजेचे आहे, असे या संक्रमणकाळात प्रकर्षाने जाणवते. अधिक वाचनासाठी मार्गदर्शक ग्रंथसूची दिल्याने अभ्यासकांना ती उपयुक्त आहे.

आधुनिक भारताचे विचारस्तंभ
लेखक – रामचंद्र गुहा
अनुवाद – शारदा साठे
प्रकाशक – रोहन, प्रकाशन, पुणे ३०
पृष्ठे -८००
किंमत-५९५