आधुनिक इतिहासाचे परखड विवेचन

1

>> शिल्पा सुर्वे

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हाती घेतलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पापैकी एक म्हणजे ‘आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास’ ही मालिका. या मालिकेतील दुसरा वजनदार असा खंड वाचकांच्या हाती पडला आहे. प्रसिद्ध गॅझेटिअरकार डॉ. के. के. चौधरी यांनी ‘आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास खंड 2’ लिहिला आहे. डॉ. चौधरी हे महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअर विभागात 15 वर्षे संचालक होते. या विभागात त्यांनी तब्बल 38 वर्षे काम केले. त्यामुळे दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागार आणि महाराष्ट्र शासनाच्या अभिलेखागारांमधून मिळवलेल्या अनेक गोपनीय दस्तऐवजांच्या आधारावर हा ग्रंथ आहे. ब्रिटिश राजवटीतील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक शोषणाच्या राजनीतीशी हिंदुस्थानींनी केलेल्या संघर्षाचा हा इतिहास आहे. या शोषणाविरोधात महाराष्ट्राने दिलेल्या घवघवीत योगदानाचे दर्शन या ग्रंथातून घडते.

खंड 2 चा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे. यातून मुंबईला असलेली राष्ट्रवादी जाणिवांची प्रदीर्घ परंपरा अधोरेखित होते. 1919 -20 पासून कलोनिअल राजवटीविरुद्धचा लढा मुंबईतून उभारला गेला. हिंदुस्थानभरच्या आंदोलनासाठी मुख्यतŠ मुंबई शहराने प्रचंड निधी पुरवला. रौलट आणि असहकार चळवळीचे मुख्यालय मुंबईत होते. कायदेभंग लढा व छोडो भारत क्रांतिलढय़ाचा प्रारंभच नव्हे तर देशभरचे सूत्रसंचालन व नियमन मुंबईतूनच करण्यात आले. क्रांतिकारकांनी मुंबईतूनच उभारलेल्या डिरेक्टोरेटने संपूर्ण देशभर यंत्रणा चालवली. मात्र ब्रिटिश गुप्तचरांनाही या यंत्रणेचा सुगावा लागला नाही. स्वतŠला बुद्धिवान समजणारी ब्रिटिश यंत्रणा क्रांतिकारांच्या डिरेक्टोरेटपर्यंत कधीच पोहोचू शकली नाही. विशेष म्हणजे डिसेंबर 1945 मध्ये नेहरू आणि अन्य नेते बंधमुक्त होईपर्यंत त्यांनाही ही यंत्रणा माहीत नव्हती. मात्र या यंत्रणेच्या नेत्या अरुणा असफ अली व सुचेता कृपलानी गांधीजींना तुरुंगात भेटल्या होत्या. याविषयीच्या कित्येक फायली दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागारात आहेत. अशा अप्रकाशित घटनांचा अभ्यास करून क्रांतिलढय़ाचा इतिहास परिपूर्ण करण्याचा प्रयत्न डॉ. चौधरी यांनी खंड 2 च्या माध्यमातून केला आहे.
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना डॉ. चौधरी यांनी दुर्लक्षित राहिलेल्या खऱया क्रांतिकाराकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये सेनापती बापट, शंकरराव देव, युसुफ मेहेरअली, खुर्शिद नौरोजी, विनायकराव भुस्कुटे यांचे कार्यकर्तृत्व ब्रिटिश दस्तऐवजाच्या आधारे प्रकाशात आणले आहे. महाराष्ट्रावर वर्णजातिभेद, अनिष्ट रुढी परंपरा यांचे जोखड होते. त्याविरोधात समाजसुधारक प्रवृत्तींनी दिलेल्या लढय़ाचे वर्णन या खंडात वाचावयास मिळते. याच मालिकेत प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधन मासिकाद्वारे चालवलेली सुधारवादी चळवळ, मुलुख मैदानी व्याख्यानांनी घातलेला समाजजागृतीचा पाया, जातीय अभिनिवेश आणि स्पृश्यास्पृश्यतेचा मनस्वी तिटकारा करीत अनिष्ट रुढींवर केलेले प्रहार यांचे विवेचन या प्रकरणात आहे. प्रबोधनकारांच्या घराशेजारी दहा-अकरा वर्षांच्या बालिकेचा विवाह पासष्टीच्या म्हाताऱयाशी होणार होता. प्रबोधनकारांनी या लग्नाचा मंडप जाळून टाकला आणि आपला निषेध व्यक्त केला. तेव्हापासून ते क्रिशाशील समाजसुधारक झाले आणि त्यांनी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना गुरू मानले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रबोधनकारांशी असलेल्या संबंधाविषयी म्हटलंय, माझ्या शिक्षणप्रसाराच्या कार्यालयाचा अखिल हिंदुस्थानात आज मोठा बोलबाला होऊन राहिला आहे, पण आज मी एक गुपित बाहेर फोडतो, रयत शिक्षण ही कल्पना माझी असली तरी त्या बीजाला चैतन्याचे, स्फूर्तीचे आणि उत्साहाचे अंकुर फोडणारे मला संकटसमयी धीर देणारे, मार्ग दाखवणारे माझे गुरू फक्त प्रबोधनकार ठाकरे आहेत. समाजसुधारणा अभिनयातील अशा महनीय व्यक्ती आणि त्यांचे कार्य या खंडातून वाचावयास मिळते.

डॉ. चौधरी यांनी ब्रिटिश दस्तऐवजांच्या आधारे दलित मुक्तीआंदोलन त्यातही गांधीप्रणीत अस्पृश्योद्धारचा धांडोळा घेतला आहे. मंदिर प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काही काँग्रेसजनांसह नाशिकच्या काळाराम मंदिराभोवती सतत तीन वर्षे सत्याग्रह केला. मात्र तीन वर्षांनंतरही काळारामची दारे व कर्मठ हिंदू मने उघडली नाहीत. साहजिकच त्यांनी मंदिराचा नाद सोडला. यामुळे व्यथित झालेल्या गांधीजींनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून देशभराच्या अस्पृश्यांना मंदिरांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तब्बल 20 किमीचा हरिजन दौरा केला. या मॅरथॉन पदयात्रेत गांधीजींनी गुरुवायुर, तिरुपती, पद्मनाभम, मीनाक्षी, कन्याकुमारी तिरुअनंतपुरम अशी कित्येक मोठमोठी मंदिरे हरिजनांसाठी बंधमुक्त केली. त्याकाळची ही महान उपलब्धी होती. पंढरपूरचा विठोबा साने गुरुजींनी मुक्त केला.

याशिवाय शहीद भगतसिंग व क्रांतिकारकांच्या फाशीची सजा रद्द करण्यासाठी गांधीजींनी कसोशीने केलेले सर्व उचित प्रयत्न आणि 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आलेल्या हिंदुस्थानच्या राज्यघटनेतत नमूद केलेली मूलभूत अधिकारविषयक कलमे आणि तरतुदींचा मूळ पाया 1931 मधील कराची ठरावानेच घातला आहे, यासंदर्भातील माहिती सरकारी अभिलेख आणि कागदपत्रांवरून दिली आहे.

इतिहास लिहिताना सत्यनिष्ठ, तटस्थता आणि पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न डॉ. चौधरी यांनी केला आहे. राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातून सर्व महत्त्वाच्या घटनांचे आणि प्रसंगाचे वर्णन निष्पक्षपणे केले आहे. लेखकाने अर्थशास्त्रात एम. ए. केले आहे. त्यामुळेच सरकारी शोषणाचा मुकाबला करण्यासाठी 1930 व्या स्वातंत्र्य आंदोलनात गांधीजींनी केलेल्या 11 मागण्यांपैकी 8 आर्थिक मागण्या होत्या, हे अधोरेखित होते. त्याचप्रमाणे त्यांचे कलाप्रेमही त्यांच्या लेखनातून जाणवते. प्रदीर्घ विद्याव्यासंग, परिश्रम यातून साकार झालेला हा संशोधन प्रकल्प म्हणजे म्हणजे डॉ. चौधरी यांनी इतिहास व ग्रंथविश्वाला दिलेले अमोल योगदान होय.

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास खंड दुसरा

लेखक – डॉ. के. के. चौधरी
प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
पृष्ठs – 1,160, मूल्य – 1,509