‘आनंदयात्री’ पाडगावकर

>> अरविंद दोडे

मंगेश पाडगावकर! सव्वीस काव्यसंग्रहांचे कवी. हे मराठीतले सर्वाधिक लोकप्रिय कवी. अनेक काव्यसंग्रहांच्या अनेक आवृत्त्यांचे कवी. कवितेत निरनिराळे प्रकार हाताळणारे प्रयोगशील कवी. जीवनाच्या अंतापर्यंत कवितेची साथ न सोडणारे कवी. १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ला येथे त्यांचा जन्म झाला. १९५० मध्ये त्यांचा ‘धारानृत्य’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि मग कवितावाचनाच्या कार्यक्रमांचा सिलसिला अखेरपर्यंत टिकून राहिला. १९५३ मध्ये ‘जिप्सी’ हा संग्रह झाला.

डॉ. उषा खंदारे यांनी पाडगावकरांच्या केवळ काव्याचीच आस्वादक समीक्षा नसून त्यांच्या ललित लेखनादी साहित्याचीही दखल घेतली आहे. हे या ग्रंथाचे खास वेगळेपण आहे. पाडगावकर, बापट आणि करंदीकर यांनी कविता घराघरात पोहोचली. लोकांना कसे ऐकावे, हे न सांगता शिकविले आणि सामान्यजनांना रसिक होण्याचे भाग्य लाभले! तसे पाहिले तर या दगडांच्या देशाला अधिक आवडते ती लावणी आणि पोवाडय़ांची शाहिरी कळा. साठच्या दशकात आणि नंतरही नव्या पिढय़ांना चोरून का होईना, या तिन्ही कवींनी प्रेमिकांना धाडस दिले. मराठी तरुणी त्या काळात प्रियकरापेक्षा पतीचीच स्वप्नं पाहत होती. प्रेम कसे करावे हे जसे कृष्णधवल चित्रपटांनी सांगितले. तसेच गीतांनी प्रेमीवीरांना गाणाऱया पक्ष्यांचे पंख दिले म्हणून पाडगावकरांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. त्या दृष्टीने हे पुस्तक निश्चितच अभिनंदनास पात्र आहे.

आरंभी पाडगावकरांची ओळख करून देताना काही मजेदार किस्से लेखिकेने नोंदविले आहेत. कबीर, मीरा हे अनुवादित संग्रह, परंतु मूळ कवितांप्रमाणे हे म्हणावे तितके गाजले नाहीत. कबीराची विद्रोही वृत्ती आणि मीरेचे प्रेम हे मराठीला पेलवत नसावे. ज्ञानेश्वर अन् मुक्ताबाईंच्या अध्यात्मभूमीवर भक्तीला महत्त्व आहे. त्यातील ‘प्रेमाभक्ती’ इथे रुजण्यासाठी नवे युग यावे लागेल. पाडगावकरांच्या काव्यातील प्रेमही असेच केवळ कागदावरच राहिले आहे. मस्तानीपासून आतापर्यंत प्रेमी जिवांचे मुडदे पाडणारी संस्कृती बदलायला पुन्हा कृष्णाचे द्वापारयुग यावे लागेल. प्रेमजीवनाला स्वीकारण्यापेक्षा समाज संसारसुखाला मान्यता देतो! तरीही पाडगावकर पेमकवी म्हणून सर्वत्र कसे गाजले, हे त्यांच्या कवितेवरील या रसाळ भाष्यातून लक्षात येते. दुसरी बाजू आहे बालगीतांची. तीही किती दमदार आहे हेही लेखिकेने पटवून दिले आहे.

पाडगावकरांचे तीन ललित लेखसंग्रह काव्यमय आहेत. दोन समीक्षा ग्रंथही अभ्यासनीय असून सुमारे ३३ ग्रंथ चरित्रात्मक, अनुवादित कादंबरी आणि संकीर्ण लेखसंग्रह आहेत. लेखनाचा हा भलामोठा पसारा पाहता ते कायम कार्यरत होते, याची खात्री पटते. २०१३ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ सन्मान मिळाले. अनेक महत्त्वाचे पुरस्कार लाभले. विशेष म्हणजे त्यांना संपूर्ण शेक्सपियर मराठीत आणायचा होता, पण ते काम अपुरेच राहिले. प्रतिभा आणि सुदैव यांचा हा सुंदर मेळ होता.

३० डिसेंबर २०१५ मध्ये त्यांनी डोळे मिटले. एक गाणारा पक्षी अनंताच्या अरण्यात कायमचा निघून गेला.

आनंदयात्री मंगेश पाडगावकर / काव्यास्वाद
लेखक – डॉ. उषा खंदारे
प्रकाशन – कोमल प्रकाशन, नालासोपारा, ठाणे.
पृष्ठ – ३५६, मूल्य – रुपये ४००/-