जगण्याचे नवे पैलू

>> डॉ. नीलम ताटके

अर्धसत्य’ हा सर्वोत्तम साताळकर यांचा पहिलाच कथासंग्रह आहे. अर्थात यातील कथा पूर्वी दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत.

या कथा आजच्या आधुनिक जगातील सामाजिक परिस्थिती, संघर्ष आणि मानवी नातेसंबंध यांचे चित्रण करणाऱया आहेत. सामाजिक आंदोलने, दहशतवाद, आधुनिक स्त्री-पुरुष संबंध असे सध्याचे विषय या कथांमध्ये आहेत. सामान्यतः कथांचा शेवट गोड असलेल्या कथाच वाचायला मिळतात, परंतु या कथांचे शेवट मात्र कलाटणी देणारे, वास्तवाला धरून असलेले आहेत. कथा वास्तवाला थेट भिडणाऱ्या आहेत.

यामध्ये ‘एक क्षण मोहाचा’, ‘गुंतता हृदय हे’ या कथा स्त्री-पुरुष संबंधांचे वेगळेच पैलू समोर आणणाऱया आहेत. ‘आंदोलन’ आणि ‘पराभव’ या कथांमध्ये राजकारण्यांचे ढोंगीपण, त्यांचे प्राधान्यक्रम, सत्तेची हाव आणि उन्मत्तपणा यांचे यथार्थ दर्शन झाले आहे. ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ ही कथा तर्कशुद्धता की भावनिकता याबाबत विचार करायला लावणारी आहे. ‘संघर्ष’ कथेमधलं डेव्हिड कूपरचं आमूलाग्र बदलणं आणि कुटुंबातील इतर व्यक्ती व डेव्हिड यांची टोकाची भिन्न विचारसरणी, माणूस खरंच इतका बदलू शकतो का, हे मत मनात गुंता निर्माण करते. ‘ज्याचं त्याचं जग’ ही कथा जगण्याचा वेगळाच अर्थ सांगून जाते. माणसाच्या आयुष्यातल्या ठरावीक प्रश्नांची जाणीव सगळय़ांनाच असते, परंतु या कथांमधील प्रश्नही वेगळे, त्यांची उत्तरंही वेगळी.

विशेष म्हणजे या कथांमधील स्त्रिया या कर्तबगार, प्रश्नांना सामोर्‍या जाणार्‍या, जगण्याशी लढणार्‍या दाखवल्या आहेत. पराभव कथेतल्या मोगूबाई विजापूरकरांचा बाणेदारपणा थक्क करणारा. ‘गुंतता हृदय हे’मधील शर्वरीचं ‘आतला आवाज’ योग्य ते सांगतोय हे जाणून श्रीनिवासकडे जाणं मनाला भिडतं.

एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करायला हवा. प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला त्याच्या काल्पनिकतेची ग्वाही दिली जाते. इथे मात्र लेखकाने म्हटले आहे की, ज्या कथा सामाजिक विषयावर असतात त्या पूर्णपणे काल्पनिक नसतात.

या पुस्तकाची वैशिष्टय़पूर्ण प्रस्तावना हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रा. विश्वास वसेकर यांनी ‘कथा’ या विषयावर विश्लेषणात्मक प्रस्तावना लिहिली आहे. यातील कथांचे चेकॉव्हच्या कथांशी साधर्म्य दर्शवले आहे.

एखाददोन कथा वगळता यातील पात्रे परिस्थितीपुढे शरणागत होत नाहीत असे विशेषकरून जाणवते. मग ती लॉरा असो की वसुधा किंवा ‘स्वयंभू’ कथेतला लेखक.
पुस्तकाचे मुखपृष्ठ कथांमधील विषयांची काहीशी कल्पना देणारे आहे. स्त्री-पुरुष संबंधांवरच्या कथा आहेत त्याचे प्रातिनिधिक चित्र चांगले आहे. कथांमध्ये विषय वैविध्य असल्याने त्या वाचनीय आहेत. साधी, सोपी भाषा, व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे अचूक रेखाटन यामध्ये जाणवते.

आपल्याला जगण्याचे नवे पैलू दाखवणारे हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केले आहे.

अर्धसत्य
लेखक – सर्वोत्तम सताळकर
प्रकाशक – उत्कर्ष प्रकाशन
पृष्ठ – २३२, किंमत – रु.२५०